जसलमेर: राजस्थानमधील जसलमेर रेल्वे स्थानक परिसरात एक अजब घटना घडली. गटारावर टाकण्यात आलेली सिमेंटची लादी तुटल्यानं पाच जण कोसळले. एका गॅरेजमध्ये ही घटना घडली. उभे असलेले चार तरुण आणि त्यांच्या शेजारी बसलेला एक तरुण अवघ्या काही सेकंदांत खाली पडले. त्यांच्या शेजारी उभी करण्यात आलेली एक दुचाकी त्यांच्यावर कोसळली. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत रेकॉर्ड झाली. घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
जसलमेरमधील बाबा बावडी येथे मुख्य रस्त्याजवळ श्रवण चौधरींचं पंक्चर काढण्याचं दुकान आहे. दुकानाच्या बाजूलाच गटार आहे. पावसाचं पाणी वाहून जाण्यासाठी हे गटार तयार करण्यात आलं आहे. नाल्यावर सिमेंटच्या लाद्या टाकण्यात आल्या आहेत. दुकानात श्रवण चौधरी यांच्यासोबत दोन तरुण काम करत होते. तितक्यात दोन तरुण तिथे स्कॉर्पिओ घेऊन आले. त्यांना कारचं पंक्चर काढायचं होतं.
स्कॉर्पिओमधून आलेले दोघे आणि दुकानात काम करणारे दोन तरुण बोलत होते. त्यावेळी एक जण खाली बसून पंक्चर काढत होता. तितक्यात नाल्यावर ठेवण्यात आलेली लादी तुटली आणि बघता बघता पाच जण खाली कोसळले. शेजारीच असलेली दुचाकीदेखील त्यांच्यावर पडली. सुदैवानं त्यांना किरकोळ दुखापत झाली. तरुण स्वत:च गटारातून बाहेर आले आणि त्यांनी दुचाकीदेखील बाहेर काढली.