'असावा सुंदर चॉकलेटचा बंगला, चंदेरी सोनेरी चमचमता चांगला' हे बालगीत तुम्ही अनेकदा ऐकलं असेल. आता या गाण्यातील बोल प्रत्यक्षात उतरले आहेत. आतापर्यंत वेगवेगळ्या डिझाइनचे चॉकलेट तुम्ही खाल्ले असतील किंवा पाहिले असतील. पण चॉकलेटपासून तयार करण्यात आलेल्या घराबाबत तुम्ही ऐकलंय का? नाही ना? पण हे खरंय फ्रान्समध्ये एक कॉटेज आहे जे चॉकलेटपासून तयार करण्यात आलंय.
महत्त्वाची गोष्ट म्हणजे या कॉटेजमध्ये लोक राहतात सुद्धा...दूरुन पाहिलं तर हे कॉटेज लाकडापासून तयार केल्याचं दिसतं. पण या घरातील सर्व वस्तूंमुळे आणि येणाऱ्या सुंगधामुळे तुम्ही चॉकलेटच्या घरात आहात याची जाणिव होते. या कॉटेजच्या दरवाजे आणि सर्व वस्तू चॉकलेटने तयार करण्यात आल्या आहेत. सध्या या घराचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, या खासप्रकारच्या कॉटेजचं डिझाइन प्रसिद्ध आर्टिसन चॉकलेटिअर जेन-लुक डीक्लूजेऊ हे आहेत. त्यांनी या घराची प्रत्येक गोष्टी ही चॉकलेटने तयार केली आहे.
या २०० क्वेअर फूट शानदार कॉटेज बनवण्यासाठी १.५ टन चॉकलेटचा वापर केला गेला आहे. जर तुम्हाला या चॉकलेटच्या कॉटेजमध्ये रात्र घालवायची असेल तर बुकिंग डॉट कॉम या वेबसाईटवर तुम्ही बुकिंग करु शकता. सध्या या कॉटेजची सोशल मीडियात चर्चा रंगली असून त्यावर लोकांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रियाही येत आहेत.