शाही पनीर, दाल मखनी, रोटी आणि रायता असे तुम्हाला २६ रुपयांत पोटभर जेवायचे आहे का?, तर मग फक्त तुम्हाला टाइम मशीन शोधून सन १९८५ मध्ये जावे लागेल. अन्यथा सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा फोटो पाहून समाधान मानावे लागेल. एका नेटिझनने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत हा त्याचा जेवणाचा अनुभव शेअर केला आहे.
कपाटाची साफसफाई करताना त्याला त्याने १९८५ साली भोजन केलेल्या एका हॉटेलचे बिल सापडले. त्याने त्यावरचा तपशील वाचला आणि मग ते बिल, त्यात नमूद केलेले पदार्थ आणि त्या पदार्थांचे फोटो असे सारे त्याने शेअर केले. त्यावेळी शाही पनीरची किंमत ८ रुपये तर दाल मखनीची किंमत ६ रुपये इतकी होती. एका रोटीची किंमत ७० पैसे इतकी होती तर रायताची किंमत ५ रुपये होती. भरपेट जेवल्यानंतर ते बिल झाले होते २४ रुपये ३० पैसे आणि यावर सेवा कर आकारला होता २ रुपयांचा. असे एकूण त्याने २६ रुपये ३० पैशांचे बिल भरले होते. आता २०२२ साली तुम्हाला हेच जेवण जेवायचे असेल तर किती पैसे मोजावे लागतील? करा हिशेब !