नवी दिल्ली : दिल्ली महानगरपालिकेच्या (MCD) निवडणुकांचे आज निकाल समोर आले. यामध्ये एक्झिट पोलप्रमाणे 'आप'नेभाजपाला 15 वर्षांच्या सत्तेतून बेदखल केले आहे. आप बहुमताने सत्तेत आली आहे. दिल्ली महानगरपालिका निवडणुकीत बहुमत मिळवून आम आदमी पक्षाने भारतीय जनता पक्षाची (BJP) 15 वर्षांची सत्ता संपवली आहे. एमसीडी निवडणुकीच्या निकालांची सोशल मीडियावरही जोरदार चर्चा होत आहे. सोशल मीडियावर वेगवेगळ्या प्रकारचे मीम्स व्हायरल होत आहेत.
दरम्यान, आम आदमी पार्टीने 134 तर भारतीय जनता पक्षाने 104 जागांवर विजय मिळवला आहे. तर कॉंग्रेसने 9 जागा जिंकल्या आहेत. लक्षणीय बाब म्हणजे बहुमतासाठी कोणत्याही पक्षाला 126 जागा मिळवणे गरजेचे होते. त्यामुळे 'आप'ने दिल्ली महापालिकेवर एकहाती झेंडा फडकवला आहे. या निवडणुकीत काँग्रेसच्या खराब कामगिरीवर अनेक मीम्स व्हायरल होत आहेत.
दिल्ली एमसीडीच्या निवडणुकीत आम आदमी पक्षाला 42.5 टक्के मते मिळाली. तर त्याखालोखाल दुसऱ्या क्रमांकाची मते भाजपाला मिळाली. मात्र एक्झिट पोलमध्ये वर्तवलेल्या अंदाजानुसार पूर्णपणे पानीपत झाले नाही एवढीच भाजपासाठी जमेची बाजू ठरली. दिल्ली एमसीडीमध्ये 2007 पासून भाजपाची सत्ता होती. 2017 मध्ये झालेल्या निवडणुकीत भाजपाने 270 पैकी 181 जागा जिंकल्या होत्या. तर आपने 48 आणि काँग्रेसने 30 जागांवर विजय मिळवला होता. दरम्यान, या वर्षीच्या सुरुवातीला केंद्र सरकारने दिल्लीतील तीनही महानगरपालिकांचं एकत्रीकरण करून एकच महानगरपालिका स्थापन केली होती. तसेच वॉर्डची संख्या घटून 250 एवढी झाली होती.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"