मुंबई : देशी जुगाड करण्याच्या बाबतीत भारतीयांचा कोणी हात धरू शकत नाही असे बोलले जाते. पैसा वाचवण्यासाठी 'मध्यमवर्गीय' लोकांपेक्षा कोणीही हुशार असू शकत नाही. याचाच प्रत्यय देणारा एक फोटो खूप व्हायरल होत आहे. खरं तर हा देशी जुगाड मुंबईतील एका हॉटेलमधील आहे. ज्यामध्ये एक एसी दोन खोल्यांमधील लोकांना गारवा देण्याचे काम करत आहे. यामागची संकल्पना देखील गमतीशीर आहे. एकाचवेळी दोन्ही रूममधील लोकांना गारवा देणाऱ्या एसीचा रिमोट कोणाकडे असतो असा मजेशीर प्रश्न विचारला जात आहे. मल्टीमीडिया कलाकार आणि पॉडकास्टर अनुराग मायनस वर्मा यांनी हा फोटो ट्विटरवर शेअर केला आहे. त्यांनी त्याला कॅप्शन दिले, "ती अक्षरशः एक स्प्लिट एसी खोली होती जी दोन खोल्यांमधील लोकांना सेवा देत आहे."
एसीचा रिमोट कोणाकडे?हे प्रकरण सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर अनेक युजर्संनी त्यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत. काहींनी विचारले रिमोट कोणाकडे आहे? त्यावर संबंधित युजर्सने उत्तर दिले की रिमोट नाही, त्यामुळे तो एसीचे तापमान कमी करू शकत नाही किंवा बंदही करू शकत नाही. हा फोटो व्हायरल झाल्यानंतर एका युजर्सने मजेशीरपणे म्हटले की, आता हे प्रकरण राष्ट्रीय विषय बनले आहे! त्याच वेळी, इतर काही युजर्संनी हॉटेलचे नाव आणि ठिकाण विचारण्यास सुरुवात केली. तर काही नेटकरी यावरून भन्नाट मीम्स व्हायरल करत आहेत.
व्हायरल होणाऱ्या फोटोत दोन खोल्यांमध्ये एक स्प्लिट एसी बसवण्यात आली आहे. ही एक एसी अशाप्रकारे बसवण्यात आली आहे की त्यामुळे दोन्ही खोल्यांमधील लोकांना त्याचा लाभ घेता येत आहे. दोन्ही खोल्यांमध्ये एकाच वेळी गारवा होण्यासाठी भिंतीमध्ये एक छिद्र तयार केले गेले आहे. दरम्यान, फोटो व्हायरल करणाऱ्या युजर्सने हॉटेलचे नाव गुपित ठेवले आहे. मात्र त्याने 2011 मध्ये रूम बुक केल्याचा खुलासा केला. नंतर त्याने हे देखील उघड केले की त्याला एसीचा रिमोट देण्यात आला नव्हता. कोणताही वाद होऊ नये म्हणून व्यस्थापनाने तापमान 24 अंशांवर सेट केले होते, असे त्याने अधिक म्हटले.