Pakistan female sports anchor Zainab Abbas: क्रिकेटच्या मैदानावर तुम्ही अनेक विचित्र गोष्टी पाहिल्या असतील. काही मनोरंजक तर काही अशी छायाचित्रे जी तुम्हाला हसायला लावतील. पण, आज तुम्हाला जो व्हिडीओ पाहायला मिळणार आहे तसं याआधी क्वचितच पाहिले गेले असेल. हे खरंच एक विचित्र पण खुदकन हसायला लावणारे दृश्य आहे. आतापर्यंत आपण क्रिकेटपटू आणि चाहत्यांसोबत मैदानावर घडणारे मजेदार किस्से पाहिले आहेत, पण सध्या व्हायरल होणारा व्हिडीओ काही वेगळाच आहे. कारण हा प्रकार थेट सामन्याची ऑन-फिल्ड मुलाखतकार पाकिस्तानी अँकरशीच संबंधित आहे.
पाकिस्तानी अँकर झैनाब अब्बास ही क्रीडा जगतातील एक प्रसिद्ध चेहरा आहे. आयसीसीच्या अनेक स्पर्धांमध्ये तिने उल्लेखनीय कामगिरी केली आहे. पाकिस्तान सुपर लीगमध्ये तिचे अँकरिंग पाहायला मिळते आणि सध्या दक्षिण आफ्रिकेत सुरू झालेल्या नवीन टी२० लीग SA20 मध्येही ती अँकरिंग करत आहे. पण, या स्पर्धेत खेळल्या गेलेल्या सामन्यादरम्यान तिच्यासोबत असे काही घडले की, तिला अशा परिस्थितीत काहीच करता आले नाही.
SA20 सामन्यात ही घटना घडली!
काल SA20 लीगमध्ये मुंबई इंडियन्स केपटाऊन आणि सनरायझर्स इस्टर्न कॅप यांच्यात सामना झाला. या सामन्यात सनरायझर्सची इनिंग सुरू होती. मुंबईने दिलेल्या १७२ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना एक चेंडू फलंदाजाने मारला आणि त्याचवेळी जैनाब अब्बास सीमारेषेजवळ उभी असताना धडामकन पडली.
१३व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर सनरायझर्सचा फलंदाज मार्को येन्सन स्ट्राइकवर होता. गोलंदाजी करणारा मुंबई संघाचा सॅम करन होता. करनच्या चेंडूवर येन्सनने फटका खेळला, तो थेट सीमारेषेच्या दिशेने गेला. क्षेत्ररक्षकाने त्याला सीमारेषा ओलांडण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केला तेव्हा तीच घटना घडली, जी घडायला नको होती. सीमारेषेवर मुलाखत घेत असलेला पाकिस्तानी अँकरला क्षेत्ररक्षकाचा धक्का लागला नि ती धडाम करून जमिनीवर आदळली. तिला काहीही दुखापत झाली नाही, पण घडलेला प्रकार पाहून अनेकांना हसू आवरलं नाही.