सेशेल्स: महाकाय कासवानं एका चिमणीची शिकार केल्याचा एक व्हिडीओ समोर आला आहे. व्हिडीओत कासव एका चिमणीवर हल्ला करून मग तिला खाताना दिसत आहे. कासव शाकाहारी समजल्या जाणाऱ्या कासवानं चिमणीची शिकार केल्यानं वन्यजीवतज्ज्ञदेखील हैराण झाले आहेत.
सेशेल्समधील संशोधकांनी एका विशाल कासवाला शिकार करताना कॅमेऱ्यात टिपलं. अशा प्रकारची घटना पहिल्यांदाच कॅमेऱ्यात कैद झाल्याचं संशोधकांनी सांगितलं. जुलै २०२० मध्ये फ्रिगेट बेटावर हा व्हिडीओ चित्रित करण्यात आला. त्यात एक मादी कासव लाकडाच्या मोठ्या तुकड्यावर एका चिमणीचा पाठलाग करताना दिसत आहे.
व्हिडीओत कासव चिमणीच्या दिशेनं सरसावताना दिसत आहे. कासवापासून बचाव करण्यासाठी चिमणी मागे मागे सरकते. मात्र शेवटी ती थांबते. त्यानंतर कासव तिच्या जवळ जातं आणि तिची शिकार करतं. कासवानं जाणूनबुजून शिकार केल्याचा हा पहिलाच पुरावा असल्याचं संशोधकांनी सांगितलं.
कासव जाणूनबुजून पक्ष्याचा पाठलाग करत असून त्यानं पक्ष्याला मारून खाल्लं आहे. अशा प्रकारचा व्हिडीओ पहिल्यांदाच समोर आल्याचं इंग्लंडच्या केंब्रिजमधील पर्यावरणशास्त्रज्ञ जस्टिन गेरलॅच यांनी न्यूयॉर्क टाईम्सला सांगितलं. सेशेल्स आणि गॅलापागोस द्विपसमूहावरील महाकाय कासवं शाकाहारी मानली जातात. कधी कधी ही कासवं मृत पक्षी, बकऱ्या किंवा मृत कासवांचे अवशेषदेखील खातात. मात्र स्वत: जाणूनबुजून शिकार करत असल्याचा प्रकार पहिल्यांदाच समोर आला आहे.