मगरीला पाहून सर्वसामान्य व्यक्तीला भीती वाटते. मगर दिसली की आपण शक्य तितके लांब राहतो. नदीत मगर दिसल्यावर लोकांची तारांबळ उडते. मात्र सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. त्यात एक तरुणी मगरीसोबत खेळताना दिसत आहे. त्यावर नेटकऱ्यांना एकच प्रश्न पडलाय, इतका कॉन्फिडन्स येतो कुठून?
मगर माणसासोबत मस्त खेळतेय. त्याला कोणतीही इजा न करता छान मिठी मारतेय, याची केवळ कल्पनाच आपण करू शकतो. मात्र एका तरुणीनं हे करून दाखवलंय. मगरमिठी हा शब्दच तसा नकारात्मक. पण महिलेनं मगरीला मिठी तर मारलीच. शिवाय ते सुखरुपही परतली. हे सगळं शक्य झालं ते एका प्राणी संग्रहालयामुळे. जिथे पाळीव मगरी ठेवण्यात आल्या आहेत, ज्या माणसांना इजा करत नाहीत.
मगर जंगलात असो वा प्राणीसंग्रहालयात.. तिची भीती तर वाटतेच. पण एका तरुणीनं साहस दाखवलं. ती मगरीच्या पिंजऱ्यात गेली. तिथे साडे आठ फुटांच्या मगरीनं तिला मिठीच मारली. तरुणी खाली आणि मगर वर. महिलेनं अक्षरश: मगरमिठी अनुभवली. तरुणीच्या सहकाऱ्यानं तिचा व्हिडीओ चित्रित केला. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.
तरुणीच्या अंगावर असलेल्या मगरीचं नाव डार्थ गेटॉर. तिचं वजन ९० किलो आहे. तर मगरीला अंगावर घेऊन मिठी मारणाऱ्या तरुणीचं नाव आहे ज्युलिएट ब्रेवर. ही तरुणी प्राणी संग्रहालयातच काम करते. मगर काही फूट लांब असली तर अनेकजण घाबरतात. पण ज्युलिएट मगरमिठीत असतानाही हसत होती. विशेष म्हणजे ज्युलिएटनं मगरीला पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र मगरीनं थोडाच वेळ घट्ट मिठी मारली आणि तिथून पुढे निघून गेली.