लोक अनेकदा ऑनलाइन Apps द्वारे राइड बुक करतात. कॅबचे जास्त भाडे असल्यामुळे काही लोक रॅपिडो बाईक कमी किमतीत बुक करतात. पण एका तरुणीने शेअर केलेला अनुभव जाणून घेतल्यानंतर तुम्ही पुढच्या वेळी रॅपिडो बुक करण्यापूर्वी नक्की विचार कराल. तरुणीने तिच्या X अकाऊंटवर फोटो शेअर केले आहेत, ज्यामध्ये तिच्या पायाला दुखापत झालेली दिसत आहे. रॅपिडो चालक निष्काळजीपणे गाडी चालवत होता, त्यामुळे हा अपघात झाल्याचे तिने सांगितलं.
चालकाने लगेचच राइड पूर्ण केली आणि मुलीला रस्त्याच्या मधोमध सोडून पळ काढला. अमिशा अग्रवाल नावाच्या तरुणीने गुगलमध्ये सॉफ्टवेअर इंजिनिअर असल्याचं सांगितलं आहे. तिने तिच्या फोटोच्या कॅप्शनमध्ये लिहिले की, पुन्हा कधीही रॅपिडो बाइक बुक करणार नाही. मी शुक्रवारी रात्री रॅपिडो बाईक बुक केली होती. चालक भरधाव वेगात आणि वाहतुकीच्या नियमांकडे दुर्लक्ष करत गाडी चालवत होता. कडुबीसनहल्ली (बंगळुरू) मधील आऊटर रिंग रोडवर, तो कोणतंही इंडिकेटर न वापरता अचानक सर्व्हिस लेनकडे वळला असं सांगितलं.
एक कार येत होती. बाईक आणि कार यांच्यात धडक झाली. बाईकचा तोल गेला. त्यामुळे तरुणी आणि चालक दोघेही रस्त्यावर पडले. धक्कादायक बाब म्हणजे ज्या बाईक चालकाची चूक होती त्याने त्या मुलीला मदत केली नाही. त्याऐवजी धडक दिलेल्या कारच्या चालकाने प्राथमिक उपचार केले. चालकाने तेथेच ट्रिप पूर्ण करून घटनास्थळावरून पळ काढला. मुलीने पुढे सांगितलं की रॅपिडोच्या कस्टमर केअरने तिला इंश्योरन्स क्लेम फाईल करण्यास सांगितलं आहे.
माझ्याकडे Rapido विरुद्ध काहीही नाही, पण बाईकस्वार साधारणपणे अतिशय बेफिकीरपणे गाडी चालवतात आणि मी प्रत्येकाला सल्ला देईन की त्यांना त्यांचे आयुष्य आवडत असेल तर बाईक बुक करणे टाळा असंही म्हटलं. तरुणीच्या पोस्टवर लोक प्रतिक्रिया देत आहेत. एका युजरने म्हटलं की, तुम्हाला कमी अंतराचा प्रवास करावा लागला तरीही नेहमी कॅब निवडा. बाईक किंवा ऑटोचालक दोघांवरही विश्वास ठेवता येत नाही.