सध्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने सगळीकडे हाहाकार माजला आहे. कोरोनानं अनेक कुटुंब उद्ध्वस्त केली. लहान मुलांच्या डोक्यावरील छत्र हरपल्याने ती पोरकी झाली. कोरोनाच्या या काळात काही ठिकाणी माणुसकीला लाजवणारीही घटना घडली. एका ९ वर्षाच्या मुलीनं लिहिलेलं पत्र सोशल मीडियात व्हायरल होत आहे. कर्नाटकमधील या मुलीने आईचा मोबाईल गायब झाल्याने हे पत्र लिहिलं आहे. तिच्या या पत्राची दखल घेऊन पोलिसही सक्रीय होऊन तिच्या आईचा मोबाईल शोधत आहेत.
या मुलीच्या आईचं १६ मे रोजी कोविड १९ आजारामुळे हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला. कुशालनगरचे रहिवासी ऋतिकने कोडागुचे उपायुक्त, आमदार आणि जिल्हा कोविड १९ हॉस्पिटलच्या कर्मचाऱ्यांसाठी हे पत्र लिहिलं आहे. या मुलीने पत्रात म्हटलंय की, मी, माझे आई-वडील तिघांनी कोरोना चाचणी केली होती. आईची तब्येत बिघडल्याने आम्ही तिला मदिकेरी कोविड रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. माझे वडील मोलमजुरी करतात. या काळात आम्ही शेजाऱ्यांच्या मदतीनं जीवन जगत आहे. १६ मे रोजी माझ्या आईचं निधन झालं. हॉस्पिटलमध्ये कोणीतरी माझ्या आईकडे असणारा मोबाईल घेतला. मी माझ्या आईला गमावलं, मी पोरकी झालीय. त्या फोनमध्ये माझ्या आईच्या अनेक आठवणी आहेत. त्यामुळे ज्या कोणी हा फोन घेतला असेल त्यांनी तो या पोरक्या मुलीला परत करावा असं तिने विनवणी केली आहे.
ऋतिकचे वडील नवीन कुमार यांनी सांगितले की, माझी पत्नी टीके प्रभाने १६ मे रोजी कोरोनामुळे या जगाचा निरोप घेतला. त्यानंतर तिच्याकडील वस्तू आम्हाला सोपवण्यात आल्या पण त्यातील मोबाईल गायब होता. तिच्या नंबरवर आम्ही कॉल करण्याचा प्रयत्न केला परंतु तो नंबर स्विच ऑफ येत आहेत. जेव्हापासून हा फोन नाही तेव्हापासून माझी मुलगी खूप रडतेय. त्या फोनमध्ये आमच्या कुटुंबातील अनेक आठवणींचे फोटो होते. व्हिडीओ आहेत. तिने आईच्या मोबाईलचा वापर करून ऑनलाईन वर्गात भाग घेतला होता. आता मी काहीच करू शकत नाही. ना तो फोन शोधू शकतो ना नवीन फोन घेण्यासाठी मी समर्थ आहे असं तिच्या वडिलांनी सांगितले.
याच दरम्यान या ९ वर्षाच्या मुलीनं लिहिलेलं पत्र सोशल मीडियात व्हायरल झालं. अनेक युजर्सने पोलिसांना या प्रकरणात कारवाई करण्याचं आवाहन केले. एका ट्विटला उत्तर देताना कर्नाटकचे डीजी आणि आयजीपी प्रविण सूद म्हणाले की, आमची टीम हा मोबाईल शोधण्याचा प्रयत्न करत आहे. आम्ही लवकरात लवकर हा फोन शोधू असा विश्वास त्यांनी दिला आहे. त्याशिवाय कोडागु पोलिसांची टीम हॉस्पिटल प्रशासनाच्या संपर्कात आहे. सर्व प्रकारच्या सुविधांचा वापर करून हा फोन लवकर शोधू. जिल्ह्यातील अन्य पोलिसांनाही याबाबत सतर्क केले आहे. मुलीच्या तक्रारीवरून गुन्हा नोंद केला आहे असं पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले.