नवी दिल्ली ।
मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांना थंड चहा देणं एका अधिकाऱ्याला चांगलच महागात पडलं आहे. कारण मुख्यमंत्र्यांना थंड चहा दिल्यामुळे अधिकाऱ्याला कारणे दाखवा नोटीस जारी करण्यात आली आहे. आता ही नोटीस सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून नेटकरी या नोटीसची खिल्ली उडवत आहेत.
माहितीनुसार, मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान रिवा येथे जाताना छतरपूर जिल्ह्यातील खजुराहो विमानतळावर थांबले होते. तिथे त्यांना चहा देण्यात आली. मात्र चहा बेचव आणि थंडगार होती. आता याप्रकरणी राजनगरचे कनिष्ठ पुरवठा अधिकारी राकेश कान्हवा यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. ही नोटीस राजनगरचे उपविभागीय दंडाधिकारी डीपी द्विवेदी यांनी जारी केली आहे.
नोटीसमध्ये नक्की काय म्हटलं?उपविभागीय दंडाधिकारी यांनी पाठवलेल्या नोटीसमध्ये, "११ तारखेला मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान खजुराहो येथे आले होते, त्यांच्या चहापाण्याची व्यवस्था तुम्हाला करायची होती. यादरम्यान त्यांना चहा देण्यात आला त्या चहाचा दर्जा चांगला नव्हता" नोटीसनुसार स्थानिक जिल्हा प्रशासनामध्ये अशोभनीय कृत्य केलं असून, प्रोटोकॉलच्या पूर्ततेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. तसेच तुमच्याकडून व्हीआयपींच्या व्यवस्थेला हलक्यात घेतल्यामुळे अशी परिस्थिती उद्भवली आणि त्याकडे दुर्लक्ष करण्यात आलं. हे प्रोटोकॉलच्या नियमांचं उल्लंघन केल्यासारखं आहे. मुख्यमंत्र्यांना दिलेला चहा थंड आणि बेचव होता याबाबत तुम्हाला २ ते ३ दिवसांमध्ये उत्तर द्यावं लागेल, असं नोटीसमध्ये नमूद करण्यात आलं आहे.
सोशल मीडियावर रंगली चर्चाथंड चहा दिल्यामुळे अधिकाऱ्यांना जारी केलेली नोटीस सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. या नोटीसवरून विरोधकांनी मुख्यमंत्र्यांसह भाजपावरही टीका करण्यास सुरुवात केली आहे.