नशीब असावं तर असं! मजुराला सापडला ११.८८ कॅरेटचा हिरा; एका झटक्यात झाला लक्षाधीश
By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2022 04:46 PM2022-07-11T16:46:57+5:302022-07-11T16:49:29+5:30
हिऱ्याची नगरी म्हणून प्रसिद्ध असलेल्या पन्ना जिल्ह्यातील झरकुआ गावात राहणारे रहिवाशी प्रताप सिंग यादव यांना हिरा सापडला आहे.
नवी दिल्ली: कुणाचं नशीब कधी बदलेल कुणालाच ठाऊक नसतं, अनेकवेळा नशिबामुळे भिकारी राजा होऊ शकतो. तर राजाही भिकारी होऊ शकतो. मध्य प्रदेशात असाच नशिबाचा चमत्कार पाहायला मिळाला आहे. तिथे एका क्षणातच मजुराचे नशीब बदलले आणि रातोरात तो लक्षाधीश झाला आहे. खरं तर मध्य प्रदेशातील पन्ना जिल्ह्यातील एका मजुराला किमती हिरा सापडला असून हा हिरा ११.८८ कॅरेटचा असल्याचे बोललं जात आहे. विशेष म्हणजे या हिऱ्याची किंमत लाखामध्ये असल्याचे सांगितले जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हिऱ्याची नगरी म्हणून प्रसिद्ध असलेल्या पन्ना जिल्ह्यातील झरकुआ गावात राहणारे रहिवाशी प्रताप सिंग यादव यांना हा हिरा मिळाला आहे. ते मागील तीन महिन्यांपासून दिवस-रात्र कष्ट करत होते. प्रताप सिंग शेती आणि मजुरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. गरिबीमुळे त्रस्त झालेल्या प्रताप यांनी फेब्रुवारी महिन्यात हिरा खाणीच्या कामासाठी सरकारी कार्यालयात अर्ज केला होता. १०/१० च्या हिऱ्याची खाण खोदण्याचे काम त्यांनी सरकारकडून भाडेतत्त्वार घेतले होते. प्रताप यांनी रात्रंदिवस केलेल्या मेहनतीचे अखेर फळ मिळाले आणि हा ११.८८ कॅरेटचा हिरा त्यांना सापडला.
एका झटक्यात लक्षाधीश
प्रताप यांनी कल्याणपूर येथे कामाला सुरुवात केली, जिथे त्यांना ११.८८ कॅरेटचा हिरा मिळाला. माहितीनुसार या हिऱ्याची किंमत ६० लाखांहून जास्त असल्याचे बोलले जात आहे. या घटनेची माहिती देताना डायमंड अधिकारी रवी पटेल यांनी म्हटले की, प्रताप यांना सापडलेला हिरा जॅम दर्जाचा असून हा हिरा लिलावात ठेवण्यात येणार आहे. लिलावात मिळालेल्या पैशातून १२ टक्के रॉयल्टी वजा करून राहिलेले पैसे प्रताप या मजुराला मिळतील. दरम्यान, प्रताप यांनीच हा हिरा सरकारी कार्यालयात जमा केला आहे.