लोक मोबाईलवर बोलण्यात इतके व्यस्त होतात की त्यांना त्यांच्या आजूबाजूला काय चाललं आहे तेदेखील समजत नाही. अनेकवेळा लोक फोनवर बोलत असताना गाडी चालवतात आणि रस्ता चुकतात (Use of Mobile Phone while Driving). काही लोक रस्ता ओलांडताना मोबाईलच्या स्क्रीनकडे बघतात आणि या निष्काळजीपणामुळे त्यांचा अपघातही होऊ शकतो हे विसरतात.
अनेकदा अशा घटना ऐकायला मिळतात, ज्यात मोबाईलमुळे लोकांचे अपघात झाल्याचं समजतं. अशीच एक विचित्र घटना नुकतीच पाहायला मिळाली. यात एक तरुणी रेल्वे ट्रॅकवर झोपलेली दिसते, इतक्यात अचानक तिथे ट्रेन येते आणि संपूर्ण ट्रेन तिच्या अंगावरून जाते. सहाजिकच या घटनेनंतर कोणाचाही थरकाप उडेल, मात्र इथे वेगळंच दृश्य पाहायला मिळालं.
व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये (Shocking Viral Video) एक मुलगी रेल्वे रुळावर (Railway Track) पडलेली दिसते आणि ट्रेन तिच्या अंगावरून जात असल्याचं दिसतं. काही सेकंदांनंतर जेव्हा ट्रेन तिथून निघून जाते तेव्हा ही मुलगी रुळावरच उठून बसते आणि फोनवर बोलू लागते. या घटनेचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे. एवढंच नाही तर तिने आपला चेहराही ओढणीने बांधल्याचं दिसतं. काहीच सेकंदाचा हा व्हिडिओ पाहून सगळेच थक्क झाले.
हा व्हिडिओ आयपीएस अधिकारी दीपांशु काबरा यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर शेअर केला आहे. हा व्हिडिओ शेअर करताना त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिलं, 'फोनवर गॉसिप, अधिक महत्त्वाचं आहे'. हा व्हिडिओ आतापर्यंत 62 हजारहून अधिकवेळा पाहिला गेला आहे.