नवी दिल्ली - सोशल मीडियावर सध्या एक व्हिडीओ जोरदार व्हायरल होत आहे. यामध्ये काही विद्यार्थी 59 वर्षीय शिक्षक प्रकाश बोगर (Prakash Bogar) यांच्यासोबत विचित्र मस्करी करताना दिसत आहे. विद्यार्थ्यांनी शिक्षकाच्या डोक्यात कचऱ्याचा डब्बा टाकल्याची संतापजनक घटना समोर आली आहे, कर्नाटकच्या देवनागिरी जिल्ह्यातील चेन्नागिरी तालुक्यातील नेल्लारू सरकारी विद्यालयातील ही घटना असल्याचं सांगितलं जात आहे. एका शिक्षकासोबत शाळेतील विद्यार्थ्यांनी असं कृत्य केलं जे पाहून सगळेच संतापले आहेत. मात्र वयस्कर शिक्षकाने मुलांना अशा धडा शिकवला, जो ते आयुष्यभर लक्षात ठेवतील.
मिळालेल्या माहितीनुसार, कर्नाटकच्या एका सरकारी शाळेमध्ये दहावीत शिकणाऱ्या 6 विद्यार्थ्यांनी शिक्षकाचा छळ केल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. यानंतर लोकांनी विद्यार्थ्यांविरोधात कडक कारवाई करण्याची मागणी केली. काहींनी या विद्यार्थ्यांना पोलिसांच्या ताब्यात देण्याचा सल्ला दिला. तर काहींनी या विद्यार्थ्यांना शाळेतून काढून टाका असं म्हटलं. प्रकाश बोगर पुढील वर्षी सेवानिवृत्त होणार आहेत. त्यामुळे या मुलांचं उज्वल भविष्य खराब करायला नको, असं त्यांचं म्हणणं आहे. प्रकाश बोगर यांनी जे काही केलं ते फक्त एक गुरुच करू शकतो. त्यांनी लोकांना विनंती केली की त्या विद्यार्थ्यांना माफ करा. त्यांच्याविरोधात कोणीही तक्रार दाखल करू नका आणि शाळेतून काढूनही टाकू नका.
विद्यार्थी लहान आहेत आणि या वयात चुका होतात. त्यांना शाळेतून काढण्याची किंवा पोलिसांच्या ताब्यात देण्याची गरज नसल्याचं या शिक्षकाने म्हटलं. भविष्यात हे विद्यार्थी चांगलं काहीतरी करतील अशी आशा त्यांनी व्यक्त केली. व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की काही विद्यार्थ्यांचा एक गट अचानक हिंदी शिकवत असलेल्या शिक्षकाजवळ जातो आणि त्यांच्या डोक्यात कचऱ्याचा डब्बा टाकतात. इतकंच नाही तर हे शिक्षक जेव्हा खुर्चीवर बसतात तेव्हा विद्यार्थी जाऊन त्यांना धमकी देतात आणि डोक्यात चापटही मारतात. तर दुसरा एक विद्यार्थी कचऱ्याचा डब्बा पुन्हा एकदा त्यांच्या डोक्यावर टाकतो.
इतकं सगळं होऊनही हे शिक्षक विद्यार्थ्यांना काहीच बोलत नाहीत आणि शांततेत मुलांना शिकवत राहतात. हा व्हिडीओ ट्विटर यूजर @Sharabh_Vishnu_ ने शेअर केला आहे. या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिण्यात आलं, कर्नाटकच्या शाळेत विद्यार्थ्यांनी शिक्षकाला दिलेल्या त्रासाचा व्हिडीओ व्हायरल. शेकडो लोकांनी हा व्हिडीओ पाहिला आहे. अनेकांनी या व्हिडिओवर प्रतिक्रियाही दिल्या आहेत. अनेकांनी म्हटलं की या विद्यार्थ्यांवर कडक कारवाई करायला हवी, जेणेकरून पुन्हा कोणताही विद्यार्थी असं कृत्य करणार नाही. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.