सर्वसामान्य माणूस अनेकदा पोलीस ठाण्यात जायला घाबरतो. आपण मदतीच्या भावनेनं जायचो आणि पोलीस आपल्यालाच अडकवायचे अशी भीती अनेकांना वाटते. त्यामुळे सर्वसामान्य लोक पोलिसांपासून चार हात लांबच राहतात. पोलिसांशी ना मैत्री चांगली ना दुश्मनी असंही म्हटलं जातं. मात्र सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडीओ या सगळ्यांना छेद देणारा आहे.
व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये एका पोलीस अधिकाऱ्यावर पुष्पवृष्टी होताना दिसत आहे. बदलीची ऑर्डर आल्यानं पोलीस अधिकारी सगळ्यांचा निरोप घेत आहे. स्थानिकांचं प्रेम पाहून पोलीस अधिकारी भावुक झाला आहे. त्याला अश्रू अनावर झाले आहेत. हा व्हिडीओ गुजरातच्या खेडब्रह्मामधील पोलीस उपनिरीक्षक विशाल पटेल यांचा आहे.
खेडब्रह्ममधील स्थानिक आणि पोलीस उपनिरीक्षक विशाल पटेल यांच्यात आपुलकीचं नातं आहे. विशाल पटेल यांनी त्यांच्या सहकाऱ्यांशीदेखील जिव्हाळ्याचे संबंध जपले. त्यामुळेच पटेल यांच्या बदलीचा आदेश येताच सारेच भावुक झाले. पटेल यांना निरोप देण्यासाठी एका विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. त्या कार्यक्रमाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
विशाल पटेल यांना निरोप देण्यासाठी जमलेल्या सहकाऱ्यांच्या आणि सर्वसामान्यांच्या पापण्यांच्या कडा ओलावल्या. साबरकांठा जिल्ह्यातील खेडब्रह्मा पोलीस ठाण्यात गेल्या दोन वर्षांपासून पीएसआय विशाल पटेल सेवा देत होते. त्यांच्या बदलीचा आदेश येताच त्यांना निरोप देण्यासाठी संपूर्ण गाव लोटला. सगळ्यांनी विशाल पटेल यांच्यावर पुष्पवृष्टी केली. लोकांचं प्रेम पाहून विशाल पटेल यांचे डोळे भरून आले.