टेक्नॉलॉजीच्या मदतीने लोक काय काय कामं करतील याचा काहीच नेम नाही. सध्या सोशल मीडियात एक व्हिडीओ व्हायरल झाला असून यात एका कपलचं लग्न ठरवण्यात आलंय. व्हिडीओ कॉलिंगच्या माध्यमातूनच हे लग्न ठरवण्यात आलंय. गेल्या २५ वर्षांपासून अमेरिकेतील न्यू जर्सीमध्ये राहणाऱ्या गुजराती कुटूंबात हा साखरपूडा करण्यात आल्याचं समजतं.
ट्विटरवर हा व्हिडीओ राहुल निनगोट नावाच्या यूजरने बुधवारी शेअर केला होता. आता हा व्हिडीओ व्हायरल झालाय. त्यांनी मेट्रोपार्कला टॅग करून लिहिले की, बघा तुम्ही काय केलंय? मेट्रो पार्क नावाचा एक सिनेमा आला होता. त्यात असंच काहीसं दाखवण्यात आलं होतं. याला रोका सेरमनी असं म्हणतात. जेव्हा दोन्ही परिवारातील लोक लग्नासाठी तयार असतात तेव्हा ही प्रथा केली जाते.
या व्हिडीओत एक गुजराती परिवार पारंपारिक रितीरिवाज व्हिडीओ कॉलिंगवर करताना दिसत आहे. दोन फोन दोन पाटांवर ठेवण्यात आले असून त्यांच्यासमोर वेगवेगळ्या वस्तूही ठेवण्यात आल्या आहेत. मुलगा आणि मुलीला व्हिडीओ कॉल करून कनेक्ट करण्यात आलंय. इतकेच नाही तर एक महिला फोनवरच मुलीच्या डोक्यावर ओढणी देताना दिसत आहे. तसेच फोनच्या स्क्रीनवरच टिळा लावतानाही दिसत आहेत.