मध्य प्रदेशच्या ग्वालियारमध्ये 'गुप्ताजी चाटवाले' नावानं एक पाणीपुरीवाला हल्ली चर्चेचं केंद्र बनला आहे. गुप्ताजी विकत असलेली पाणीपुरी तर चविष्ट आहेच. पण ते एका वेगळ्याच गोष्टीमुळं चर्चेत आले आहेत. कारण ते दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यांच्यासारखे अगदी हुबेहुब दिसतात. मोतीमहल बँकेच्यासमोर बैजाताल जवळ गौरव गुप्ता यांचा पाणीपुरीचा स्टॉल आहे.
अरविंद केजरीवालांसारखी चेहऱ्याची ठेवण असल्यानं गुप्ताजींकडे आता लोक दूर दूरहून पाणीपुरीचा आस्वाद घेण्यासाठी आणि त्यांच्यासोबत सेल्फी टिपण्यासाठी येतात. काही लोक तर आपला वाढदिवस साजरा करण्यासाठी गुप्ताजींना भेटतात आणि त्यांच्यासोबत सेल्फी काढतात. गुप्ताजी जागृती नगर, लक्ष्मीगंज येथील रहिवासी आहेत आणि मूळचे उत्तर प्रदेशच्या औरैया येथील आहेत.
"मी कुठेही गेलो की मला केजरीवाल नावानंच लोक आवाज देऊ लागले आहेत", असं गौरव गुप्ता सांगतात. पापडी चाट, कटोरी चाट, रसगुल्ले, दही गुजिया, खोए सामोसे इत्याती पदार्थ ते विकतात. त्यांनी आपल्या मोटारसायकलचं चालत्या फिरत्या दुकानात रुपांतर केलं आहे. गेल्या १० ते ११ वर्षांपासून ते चाट विक्रीचा व्यवसाय करत आहेत. दुपारी १२ वाजल्यापासून ते संध्याकाळी ६ वाजेपर्यंत शहरातील विविध ठिकाणी आपल्या मोटारसायकलवरुन ते चाट विक्री करतात. याआधी गुप्ताजी एक टिफिन सेंटर चालवत होते. पण लॉकडाऊन लागल्यानंतर कंपन्या बंद झाल्या आणि त्यांचा व्यवसाय ठप्प झाला होता.