कोणालाही कधीही दिसणार नाही, त्याला कोणी हात लावू शकणार नाही आणि जे कधी अस्तित्त्वात असणारच नाही, असं एक शिल्प तब्बल १८,००० डॉलर्सपेक्षा जास्त किमतीला विकलं गेलं आहे. म्हणजे सुमारे १३ लाख ४० हजार रुपयांना... सध्या जगभरच्या कलाविश्वात या अजब अदृश्य शिल्पाची आणि ते “घडवणाऱ्या” शिल्पकाराची चर्चा चालू आहे. कला म्हणजे काय? आणि कलाकृती म्हणजे काय? हे दोन प्रश्न असे आहेत, की त्यांची उत्तरं कोणीही कधीही ठामपणे देऊ शकणार नाही. अर्थात या दोन्हीच्या अनेक ढोबळ व्याख्या तयार करता येऊ शकतात. पण कुठल्या गोष्टीला कलेचा आणि कलाकृतीचा दर्जा द्यायचा, हा मात्र कायमच विवादास्पद भाग राहात आलेला आहे.
म्हणजे नाटक कला आहे का? तर आहे. तमाशा? आहे. डोंबाऱ्याचा खेळ?..… तर ती काहींच्या मते कला असेल तर काहींच्या मते नसेलही. काहींच्या मते तो ‘खेळ’च असेल. एखाद्या जागतिक दर्जाच्या चित्रकाराने काढलेलं चित्र हे कलाकृती असतं. पण एखाद्या बालवाडीतल्या मुलाने काढलेलं चित्र कलाकृती असतं का? तर ह्यॅ! ते नुसतं चित्र असतं. एखादी कृती ही कला आहे का? आणि त्यातून निर्माण झालेली कुठलीही गोष्ट कलाकृती आहे की नाही? हे ठरवणं सोपं नाहीच. पण, त्यावर निदान व्यवस्थित चर्चा होऊ शकते. कारण ती कृती किंवा ती वस्तू अस्तित्त्वात असतात! प्रत्यक्षात असतात. खऱ्या असतात.
पण, साल्व्हातोर गराउ या इटालियन शिल्पकाराने याच्या पुढचा पेच टाकला आहे. एखादं अदृश्य शिल्प जर काहीच न वापरता बनवलेलं असेल तर त्याला आपण शिल्प म्हणू शकतो का? अर्थात साल्व्हातोर गराउने हा पेच टाकला आहे हे म्हणणंदेखील तितकंसं योग्य नाही. कारण त्याने प्रश्न विचारलेला नाही. त्याने काहीही न वापरता ‘ला सोनो’ नावाचं एक अदृश्य शिल्प बनवलं आणि ते विक्रीला ठेवलं. त्याच्या त्या काहीही न वापरता बनवलेल्या अदृश्य शिल्पाला गिऱ्हाईकही मिळालं. अशा या अदृश्य शिल्पाची किंमत किती असू शकते? - या प्रश्नाचे उत्तर आहे अठरा हजार डॉलर्स! त्या शिल्पाचं नाव ला सोनो!
१९५३ साली जन्मलेला साल्व्हातोर गराउ या कलाकाराने अनेक वर्षे म्युझिशियन, व्हिज्युअल आर्टिस्ट आणि डायरेक्टर म्हणून काम केलेलं आहे. पण त्याच्या सध्याच्या कलाकृतींनी तो जास्त चर्चेत आला आहे. अर्थात ला सोनो हे काही त्याने बनवलेलं पहिलं अदृश्य शिल्प नव्हे. त्याने मिलानमधल्या पियाझ्झा डेला स्केला मध्ये “बुद्धा इन काँटेम्पलेशन” नावाचं असंच एक अदृश्य शिल्प प्रदर्शित केलं होतं. अर्थात आपण जरी त्याच्या कृतीला प्रदर्शित केलं वगैरे म्हटलं तरी प्रत्यक्षात मात्र तिथे जमिनीवर पट्ट्यांनी आखलेला फक्त एक रिकामा चौकोन होता. त्याने त्याच्या त्या अदृश्य शिल्पाचा एक छोटा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. त्यात तो म्हणतो, “तुम्हाला जरी हे शिल्प दिसत नसलं तरीही ते तिथे आहे. ते हवा आणि तत्त्वांचं बनलेलं आहे. हे शिल्प प्रत्येक व्यक्तीच्या क्रिएटिव्हिटीला आवाहन करतं. ही क्रिएटिव्हिटी प्रत्येक व्यक्तीत असते. ज्या व्यक्ती असं म्हणतात की, माझ्यात काहीही क्रिएटिव्हिटी नाही, त्यांच्यातही ती असते.”त्याचं आत्ता अठरा हजार डॉलर्सहून जास्त किमतीला विकलं गेलेलं अदृश्य शिल्प म्हणजे केवळ पाच फूट बाय पाच फुटाचा चौरस आहे. त्यावर त्याचा मालक त्याला पाहिजे तशी प्रकाशयोजना करू शकेल. अर्थात ती प्रकाशयोजना ही त्या शिल्पासाठी तितकीशी महत्त्वाची नाही, असं साल्व्हातोर गराउचं म्हणणं आहे.
‘ला सोनो’ या अदृश्य शिल्पाबाबत म्हणतो, “त्या शिल्पाचा मोकळा अवकाश हा केवळ ऊर्जेने भरलेला अवकाश आहे आणि आपण जरी तो पूर्ण रिकामा केला आणि तिथे ‘काहीही नसलं’ तरीसुद्धा हेझनबर्गच्या अनिश्चिततेच्या तत्त्वानुसार त्या ‘काहीही नसण्यालाही’ वजन आहेच आणि म्हणूनच त्यात भरलेली ऊर्जा आहे आणि तिचं कणांमध्ये म्हणजेच आपल्यामध्ये रूपांतर होतं.”साल्व्हातोर गराउच्या अदृश्य शिल्पांवर टीका करणारे किंवा त्याची चेष्टा करणारे आहेतच. पण, ज्याअर्थी त्याचं शिल्प कोणीतरी अठरा हजार डॉलर्सना विकत घेतलं, त्याअर्थी कला आणि कलाकृती याबाबत साल्व्हातोर गराउची मतं पटणारे लोकही आहेत. त्यामुळेच, कला आणि कलाकृती कशाला म्हणावं, या प्रश्नाचं ठोस उत्तर कोणीही देऊ शकत नाही. इतकंच नाही, तर एखादं शिल्प अस्तित्त्वात नसताना त्याला शिल्प म्हणावं का? याचंही उत्तर ठामपणे देता येत नाही. कारण किती झालं, तरी कला ही आस्वाद घेणाऱ्याच्या नजरेत किंवा दृष्टिकोनात असते हेच खरं. कलेकडे बघण्याची दृष्टी असेल तर अदृश्य शिल्पही डोळ्यासमोर उभं राहातं आणि ती दृष्टी नसेल तर डोळ्यासमोरचं दृश्य शिल्पही अदृश्य होऊन जातं.
अदृश्य शिल्पासाठी अदृश्य पैसे!साल्व्हातोर गराउ त्याच्या काहीच न वापरता बनवलेल्या अदृश्य शिल्पांबाबत काहीही बोलला तरी त्याच्या या शिल्पांवर बरीच टीकाही झाली आहे. इतकंच नाही तर एकाने इन्स्टाग्रामवर त्याला असंही म्हटलं की “तुझी कलाकृती विकत घेण्यासाठी माझ्याकडे आत्ता अदृश्य असलेले १,००,००,००,००० डॉलर्स आहेत!”