हाथी मेरे साथी म्हटल्यावर आपल्यासमोर छोटासा, घंटी हलवणारा हत्ती येतो. त्याची चित्रपटातली जिगरी दोस्ती आपल्याला आठवते. पण हा हत्ती खऱ्या आयुष्यात तर आहे जंगली प्राणी. तो वरून कितीही शांत दिसत असला तरी त्याला राग आला तर तो सगळ जग इकडचं तिकडे करुन टाकतो. त्यामुळे त्याला लांबूनच नमस्कार. पण काही जणांना या वन्य प्राण्यांशी खेळण्याची अतिहौस. त्यातही त्यांचे व्हिडिओज काढुन व्हायरल करण्याचीही हौस असते. पण समजा या हत्तीचा व्हिडिओ काढता काढता तो तुमच्या मागे लागला तर. अहो हे झालंय तेही खऱ्या आयुष्यात. जो व्हिडिओ काढत होता त्याच्याच मागे तो हत्ती असा काही लागला की व्हिडिओ काढण्याऱ्याची पळता भुई थोडी झाली.
त्याचं झालं असं की, आयएफएस ऑफिसर वैभव सिंग यांनी ट्वीटरवर एक व्हिडिओ पोस्ट केलाय. त्यात एक हत्ती डोंगर उतरून खाली रस्त्यावर येत असतो. त्या रस्त्यावर हा व्हिडिओ काढणारा पर्यटकही त्याच्या गाडीत बसलेला आहे. हत्ती डोंगराच्या बाजूला बांधलेली भिंत ओलांडून रस्त्यावर तर येतो. पण जो त्याचा हा व्हिडिओ काढत असतो तेव्हा त्याच्या मागेच लागतो. व्हिडिओ काढणाऱ्याला तर याचा अंदाजही नसतो. हत्तीला पळताना पाहताच तो गाडी सुरु करतो अन् धूम ठोकतो.
हा व्हिडिओ पाहुन तुम्ही नक्कीच पोटभर हसाल पण विनोदाचा भाग सोडला तर हा व्हिडिओ आपल्याला अंतर्मुख करणारा आहे. या व्हि़डिओला पोस्ट करताना या अधिकाऱ्याने लिहिलेली पोस्ट लक्ष वेधुन घेणारी आहे. तो असं म्हणतोय की मानवाच्या स्वार्थामुळे वन्यजीवांचा अधिवास लोप पावत आहे. त्याचमुळे मानव आणि प्राण्यात आता संघर्ष उत्पन्न होऊ लागला आहे. आहे की नाही ही बाब विचार करण्याजोगी?