(Image Credit : independent.co.uk)
तुमच्या बॅंक खात्यात पगारा व्यतिरिक्त अचानक पैसे आले तर सहाजिकच तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसेल आणि तुम्ही विचार करत रहाल की, पैसे आले कुठून? असंच काहीसं लंडनमधील कॅमरॉनसोबत झालं. त्याच्या खात्यात चार वेळा थोडे-थोडे पैसे आलेत. जेव्हा हे पैसे येण्याचं कारण कळालं तेव्हा कॅमेरॉन हैराण झाला.
कॅमरॉन एक दिवस कामाहून घरी परतता होता, तेव्हा रस्त्यात त्याचं पाकीट हरवलं. त्या पर्समध्ये त्याचे एटीएम कार्ड आणि काही पैसे होते. कॅमरॉनने शोधाशोध केली, पण त्याला काही पाकीट सापडलं नाही. तो घरी परतला. त्याचं पाकीट एका व्यक्तीला सापडलं. ती व्यक्ती इमानदार होती आणि त्याने कॅमरॉनचा पत्ता काढण्यासाठी ऑनलाइन बॅकिंगचा आधार घेतला.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, कॅमरॉनने सांगितले की, ज्या व्यक्तीला त्याचं पाकीट सापडलं होतं, त्या व्यक्तीने त्याच्या खात्यात चार वेळा ट्रान्झॅक्शन केलं आणि प्रत्येकवेळी एक नवीन मेसेजही पाठवला. त्या व्यक्तीने प्रत्येक मेसेजसोबत त्याचा मोबाइल नंबरही दिला होता. तसेच कॉल करण्यास सांगितले होते.
कॅमरॉनने ट्विट करून हा सगळा किस्सा सांगितला. सोबतच त्याने दोन फोटोही शेअर केलेत. लोकांनी त्या व्यक्तीचं भरभरून कौतुक केलं, ज्याला कॅमरॉनचं पाकीट सापडलं होतं. तसेच त्याने पाकिट परत करण्याची जी काही आयडिया शोधली होती, त्याचंही कौतुक केलं जात आहे.
ट्विटरवरील एका व्यक्तीने कॅमरॉनला विचारले की, त्या पैसे पाठवणाऱ्या व्यक्तीला तुझ्या बॅंक अकाउंटची माहिती कशी मिळाली? यावर कॅमरॉन म्हणाला की, ब्रिटनमध्ये कार्डवरच बॅंकची सगळी माहिती दिलेली असते.