एक तरुण मुलगा आपल्या बापाशेजारी उभा आहे. बाप स्वत:च त्याच्या हातात सिगारेट देतो आणि त्याला ती तोंडात धरायला लावतो. मुलापासून दहा-पंधरा फूट लांब जात एका ठिकाणी बसून बाप ‘पोझिशन’ घेतो. त्याच्या हातात एके-४७ रायफल आहे. बापाच्या चालण्या-वागण्यात नुसता आत्मविश्वासच नाही, तर गर्व आणि मग्रुरी दिसते आहे. तो बेदरकारपणे उभा आहे. आपल्या हातातली रायफल तो उचलतो आणि मुलानं तोंडात धरलेल्या सिगारेटवर नेम धरतो. मुलगा मान वर करतो. सिगारेट आकाशाच्या दिशेनं राहील अशा पद्धतीनं उभा राहतो. त्याच्या डोळ्यांत थोडी भीती आहे. अंगाचा थरकाप उडाला आहे. पण भीती लपवण्याचा प्रयत्न त्याच्या हालचालींमधून दिसतो आहे. बापावर त्याचा ‘विश्वास’ आहे, आपला बाप ‘चुकणार’ नाही, याची खात्रीही त्याला आहे, तरीही आतून तो बिचकलेला आहे. त्याचे पाय थोडे लटपटताहेत. त्यातल्या त्यात स्थिर उभं राहण्याचा प्रयत्न तो करतो आहे. थोड्याच वेळात गोळी चालवल्याचा आवाज येतो. मुलाच्या तोंडात असलेल्या सिगारेटचं वरच टोक बापानं आपल्या निशाण्यानं अचूक उडवलेलं असतं. सिगारेट तुटलेली असते आणि मुलगाही जिवंत असतो!
- मुलगा हलकेच आपल्या तोंडातून ती जळालेली सिगारेट बाहेर काढतो. कॅमेऱ्यासमोर धरतो. बापही त्याच मस्तीत कॅमेऱ्याच्या फ्रेममध्ये येतो. त्याच्या डोळ्यांत स्वत:विषयीचा अभिमान असतो... दक्षिणी इराकमध्ये नुकतीच घडलेली ही घटना आणि त्या घटनेचा हा व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल होतो आहे. आपल्याच मुलाच्या तोंडात सिगारेट देऊन त्यावर निशाणा साधणाऱ्या, आपल्या निशाणेबाजीची प्रौढी मिळवणाऱ्या या बापावर सध्या जगभरातून टीका होते आहे. पण आपल्याच मुलावर ‘गोळी चालवण्याची’ एवढी हिंमत बापामध्ये कुठून आली?...
आजकाल सगळ्यांच्याच हातात अगदी सहजपणे आलेली शस्त्रास्त्रे हे तर त्याचं कारण आहेच, पण बेदरकारी कुठल्या स्तरापर्यंत गेली आहे, त्याचंही दर्शन या व्हिडीओमधून होतं. आजकाल लहान मुलांमध्येही हिंसाचाराचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणावर वाढलं आहे. अमेरिकेत तर हे प्रमाण जगात सर्वाधिक आणि चिंताजनक अवस्थेत पोहोचलं आहे. अनेक शाळकरी मुलं हातात बंदुका, पिस्तूल घेऊन अंदाधुंद गोळीबार करताना, आपल्याच मित्रांचा बळी घेताना दिसतात. पालकांची मानसिकताही या गोष्टीला तितकीच कारणीभूत आहे. अमेरिकेतील घराघरांत आजकाल बंदुका, पिस्तूल, घातक शस्त्रं पाहायला मिळतात. अनेक पालक ही शस्त्रं अभिमानानं नुसती मिरवतच नाही, तर त्याचं जाहीरपणे प्रदर्शनही करतात. आपलं शस्त्रप्रेम, शक्ती आणि ‘निशाणेबाजी’ दाखवण्यावरही त्यांचा भर असतो. इराकमधली ही घटना याच मानसिकतेचं प्रत्यंतर आहे.
अनेक तज्ज्ञांनी आणि नेटकऱ्यांनी नेमक्या याच प्रवृत्तीवर बोट ठेवलं आहे. समजा, आहात तुम्ही अव्वल नेमबाज, पण नेम चुकला असता आणि तुमच्याच मुलाचा त्यात बळी गेला असता तर?.. ‘खुना’च्या गुन्ह्याखाली त्याला ताबडतोब अटक करून कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे, अशी मागणी नागिरकांनी केली आहे. ज्या इराकमध्ये शस्त्रं खेळण्यासारखी वापरली जातात, त्याच इराकमध्ये खुद्द सर्वसामान्य नागरिकांकडूनच आता अशा गोष्टींना विरोध होतो आहे, हे आश्चर्यजनक पण पुढचे पाऊल मानले जाते आहे. अशा घटनांचे पुरेसे चटके इराकी जनतेने सोसले आहेत. त्यामुळे पुन्हा आता हिंसाचार नको, त्याचं जाहीर समर्थन आणि प्रदर्शन तर नकोच नको, अशा विचारापर्यंत अनेक नागरिक आले आहेत. हा जो व्हिडीओ सध्या व्हायरल होतो आहे, तो खुद्द ‘खुदमस्त’ बापानंच सोशल मीडियावर शेअर केल्याचं म्हटलं जात आहे. नागरिकांच्या दबावामुळे या इसमाला अटकही करण्यात आली आहे. काही महिन्यांपूर्वीच घडलेल्या एका घटनेत बाप आणि त्याची तरुण मुलगी शिकारीसाठी गेले होते. बापानं आपल्या बंदुकीनं हरणाची शिकारही केली. त्याची प्रौढी आपल्या मुलीसमोर तो मारत होता. आपण किती अव्वल निशाणेबाज आहोत, हे दाखवताना बंदुकीचा चाप त्यानं ओढला. क्षणार्धात मुलगी रक्ताच्या थारोळ्यात पडली आणि मृत झाली. बापाला वाटलं होतं, हरणाची शिकार केल्यानंतर आपण बंदुकीतील इतर काडतुसं रिकामी केली आहेत, प्रत्यक्षात मात्र काडतुसं बंदुकीतच होती. आत्मप्रौढीच्या हव्यासापोटी त्याला स्वत:चीच तरुण मुलगी गमवावी लागली आणि त्याला स्वत:लाही तुरुंगाची हवा खावी लागली.
‘टार्गेट’ तसंच, मुलीच्या चिंधड्या!इराकच्या नॅशनल सिक्युरिटी एजन्सीचं म्हणणं आहे, अशा प्रकारच्या घटना आमच्याकडे वाढताहेत, हे दुर्दैवी आहे. पण आम्ही आता लक्ष ठेवून आहोत आणि अशा घटना वाढणार नाहीत, याची सर्वतोपरी काळजी घेत आहोत. प्रत्येक वेळी ते असंच म्हणतात, मात्र अजूनही परिस्थिती जैसे थेच आहे. अशाच प्रकारची आणखी एक घटना काही दिवसांपूर्वीच घडली होती. या घटनेत बापानं आपल्या मुलीच्या तोंडात ‘टार्गेट’ दिलं होतं. या खुदपसंद बापानंही आपल्या बंदुकीनं टार्गेटवर निशाणा लावला. टार्गेट तर तसंच राहिलं, पण मुलीच्या मात्र चिंधड्या उडाल्या होत्या...