वेळोवेळी आपण घरात आवराआवर करत असतो. त्यात हातरुमाल, चादरी, अंथरूण, पायपुसणी धुवायला निघतात. मात्र घराला सुशोभित करणारे पडदे दुर्लक्षित राहतात. काही लोकांच्या घरी तर ते महिनोन्महिने धूळ खात पडलेले असतात. यामागे असतो फक्त कंटाळा! मात्र लेखात दिलेला स्वस्त आणि मस्त उपाय जरूर करून बघा, जेणेकरून तुम्ही पडदे धुण्याचा कंटाळा करणार नाही!
पडद्यांची धूळ वरचेवर काढण्यासाठी व्हॅक्यूम क्लिनर हा उत्तम पर्याय आहे. अर्थात १ रुपायात करता येणारा हा तो उपाय नाही, त्याबद्दल पुढे सविस्तर माहिती दिली आहे. परंतु तुमच्या घरात भरपूर धूळ येत असेल तर व्हॅक्यूम क्लिनरची एकदाच केलेली खरेदी दीर्घकाळ उपयोगी पडू शकते. त्यामुळे धूळ निघून वस्तू स्वच्छ राहतात. आणि एवढे करूनही जेव्हा पडदे डागाळतात, तेव्हा पुढील ट्रिक कामी येईल.
एक रुपयांची ट्रिक :
होय, एक रुपयात मिळणारा शॅम्पू काही मिनिटांत पडद्यांची घाण साफ करू शकतो. पडदे स्वच्छ करण्यासाठी, प्रथम बादलीत पाणी घ्या. त्यानंतर बादलीत शाम्पू मिसळा. शॅम्पू घातल्यानंतर पडदा पाण्यात टाकून ठेवा. काही काळानंतर, तुमच्या पडद्यावरील सर्व घाण निघून जाईल. मग स्वच्छ पाण्याने दोनदा पडदा धुवा. पडदे निथळले की कडक उन्हात वाळत न टाकता गॅलरीत किंवा प्रकाशमान जागेत वाळत टाका. असे केल्याने काही मिनिटांत पडदा साफ होईल.
पडद्यावर काही डाग असल्यास तो डाग काढण्यासाठी शॅम्पूची मदत घेता येईल. डाग असलेल्या भागावर शॅम्पू लावा आणि नंतर ब्रशच्या मदतीने पडदा थोडासा घासून घ्या. त्यासाठी तुम्हाला संपूर्ण पडदा धुण्याची गरज नाही. तुम्हाला फक्त ती जागा स्वच्छ करावी लागेल जिथे डाग आहे. यानंतर तुम्ही ड्रायरच्या मदतीने पडदा वाळवू शकता.