Zomato Delivery Boy Earnings, Viral Video: हल्लीच्या धावपळीच्या जीवनात फूड डिलिव्हरी अॅपवरून जेवण किंवा खाद्यपदार्थ मागवणे ही एक सवयीची बाब झाली आहे. म्हणूनच या कंपन्या आज देशात मोठ्या प्रमाणावर कार्यरत आहेत. या कंपन्यांमध्ये दररोज हजारो लोक 'डिलिव्हरी बॉय' म्हणून काम करतात. फूड डिलिव्हरी ॲप्समुळे शहरात राहणाऱ्या लोकांना अन्न ऑर्डर केल्यानंतर काही मिनिटांतच घरपोच मिळते. हे खाद्यपदार्थ वेळेत डिलिव्हरी करणाऱ्या एजंट्सना यासाठी मोठी कसरत करावी लागते. या साऱ्या धावपळीचे त्या 'डिलिव्हरी बॉय'ने किती पैसे मिळत असतील? जाणून घेऊया.
प्रत्येकाच्या मनात नेहमीच प्रश्न असतो की या फूड डिलिव्हरी करणाऱ्या लोकांना खाद्यपदार्थ पोहोचवण्यासाठी किती पैसे मिळतात? याचसंदर्भात सोशल मीडियावर एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. त्यामध्ये एक झोमॅटो डिलिव्हरी बॉय संपूर्ण प्रक्रिया आणि यातील सत्य सांगताना दिसत आहे. फूड ऑर्डर मिळण्यापासून ते जेवणाची डिलिव्हरी करण्यापर्यंतची पूर्ण प्रक्रियाच त्यांने दाखवून दिली आहे.
डिलिव्हरी बॉयने सांगितले की त्याला एका जेवणाच्या डिलिव्हरीसाठी २० रुपये मिळतात. @munna_kumarguddu नावाच्या व्यक्तीने हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये तो सांगतो की, त्याला डिलिव्हरी ऑर्डर मिळाली आहे. रेस्टॉरंटमधून ती ऑर्डर कलेक्ट करण्यासाठी त्याला सुमारे दीड किलोमीटर जावे लागणार आहे. यानंतर तो रेस्टॉरंटमध्ये जातो आणि ऑर्डर कलेक्ट करतो. ऑर्डर तयार होण्यासाठी १० मिनिटे लागतात. त्यानंतर तो ६५० मीटर जाऊन डिलिव्हरीच्या ठिकाणी पोहोचतो. तेथे डिलिव्हरी करतो आणि त्यानंतर सुमारे अर्ध्या तासात त्याने २० रुपये कमावल्याचे तो सांगतो.
या व्हिडिओला ७७ हजारांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. त्याचबरोबर अनेकांनी या पोस्टवर मजेशीर कमेंट्सही केल्या आहेत.