Cleaning Tips : बऱ्याच घरांमध्ये प्लास्टिकच्या खुर्च्या बघायला मिळतात. या खुर्च्या हलक्या असल्याने कुठेही सहज हलवता येतात. महत्वाची बाब म्हणजे या खुर्च्या स्वस्त आणि मजबूत असतात. पण कालांतराने या खुर्च्यांवर काळे डाग लागतात. हे डाग धूळ, माती, तेल कशाचेही असतात. जे साफ करणं फारच डोकेदुखीचं काम असतं.
जर खुर्च्या पांढऱ्या, लाल, निळ्या रंगाच्या असतील तर हे डाग आणखीनच दिसून पडतात. जे घरी पाहुणे आल्यावर बरे दिसत नाहीत. अशात आज आम्ही तुम्हाला या खुर्च्यावरील डाग दूर करून त्या पुन्हा नव्यासारख्या करण्यासाठी काही सोप्या टिप्स सांगणार आहोत.
बेकिंग पावडर
बेकिंग पावडर हे समस्यांवरील रामबाण उपाय आहे. प्लास्टिकच्या खुर्च्यांवरील डाग दूर करण्यासाठी बेकिंग सोडा आणि मिठाचा वापर करू शकता. यासाठी आधी खुर्च्यांवर कोरडा बेकिंग सोडा काही वेळासाठी टाकून ठेवा. नंतर स्पंज थोडा ओला करून त्याने डाग घासा. नंतर पाण्याने खुर्ची धुवून घ्या. डाग दूर झालेले दिसतील.
विनेगर आणि पाणी
जर खुर्च्यांवर बुरशी लागली असेल तर तुम्ही विनेगर आणि पाण्याचं मिश्रण तयार करा. हे मिश्रण तुम्ही एका स्प्रे बॉटलमध्ये तयार करा. यासाठी बॉटलमध्ये 25 टक्के पाणी 75 टक्के विनेगर टाका. हे मिश्रण खुर्च्यांवर टाका. 10 मिनिटे तसंच राहू द्या. त्यानंतर खुर्च्या घासून स्वच्छ करा व पाण्याने धुवून घ्या.
लिंबाचा रस
जर तुमच्याकडे व्हाईट विनेगर नसेल तर तुम्ही लिंबाच्या रसाचाही वापर करू शकता. लिंबामध्ये अॅसिड असतं. खुर्च्या क्लीन करण्यासाठी थोड्या डिटर्जेंट पावडरमध्ये लिंबाचा रस मिक्स करा. आता ही पेस्ट खुर्च्यांच्या चिव्वट डागांवर काही वेळ लावून ठेवा. नंतर हलक्या ओल्या स्पंजच्या मदतीने डाग घासा आणि नंतर खुर्च्या पाण्याने धुवून घ्या.