हैदराबाद : भारतात बरेच जण नवीन वाहन खरेदी केले तर त्याची पहिल्यांदा पूजा (Vahan Puja) करतात. नवीन गाडी घेतल्यानंतर अनेक जण वाहन पूजा करण्यासाठी मंदिरात घेऊन जातात. गेल्या अनेक वर्षांपासून सुरु असलेली भारतातील ही पंरपरा आजही कायम आहे. पण, आतापर्यंत आपण वाहने पूजा करण्यासाठी मंदिरासमोर आणल्याचे पाहिले असेल. मात्र, एका व्यक्तीने चक्क हेलिकॉप्टरची पूजा ( Helicopter Vahan Puja ) करण्यासाठी ते थेट मंदिराजवळ आणले. या घटनेची सध्या सोशल मीडियावर मोठ्याप्रमाणात चर्चा सुरू आहे.
हैदराबादमधील एका व्यावसायिकाने आपल्या नवीन खासगी हेलिकॉप्टरची पूजा करण्यासाठी ते मंदिराजवळ आणले. बोनीपल्ली श्रीनिवास राव असे या व्यावसायिकाचे नाव आहे. बोनीपल्ली श्रीनिवास राव यांनी आपले हेलिकॉप्टर मंदिरात पूजेसाठी आणले होते. मिळालेल्या माहितीनुसार, बोनीपल्ली श्रीनिवास राव हे प्रथिमा ग्रुपचे मालक आहेत. त्यांनी आपले नवीन हेलिकॉप्टर ACH-135 वाहन पूजेसाठी यादद्री येथील श्री लक्ष्मी नरसिंह स्वामी मंदिराजवळ आणले होते. यावेळी त्यांनी पुजाऱ्यांमार्फत हेलिकॉप्टरची विशेष पूजा करुन घेतली. या हेलिकॉप्टरची किंमत जवळपास 47 कोटी इतकी आहे.
दरम्यान, भारतात कोणतीही नवीन वस्तू किंवा गाडी घेतली, तर त्याची पूजा करण्याची परंपरा आहे. तसेच, नवी गाडी घेतल्यानंतर वाहन पूजा करण्यासाठी मंदिरात घेऊन जातात. मात्र, हेलिकॉप्टरची पूजा करण्यासाठी ते थेट मंदिराजवळ घेऊन जाण्याची पहिलीच घटना असल्याचे म्हटले जात आहे. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तसेच, ट्विटरवर हा व्हिडिओ lateefbabla यांनी पोस्ट केला आहे.