कोरोना व्हायरसच्या माहामारीमुळे लोकांच्या जीवनावर नकारात्मक परिणाम घडून आला आहे. व्हायरसचा प्रसार कमी करण्यासाठी जवळपास दोन ते तीन महिने पूर्ण लॉकडाऊन होतं. या कालावधीत अनेकांच्या नोकऱ्या गेल्या, तर कोणाची पगार कपात. अनेकजण आपल्या घरापासून खूप लांब होते. त्यामुळे दोनवेळचं जेवण मिळणंही खूप कठीण झालं होतं. अशा स्थितीत विविध क्षेत्रातील लोकांनी गोरगरीबांना मदतीचा हात दिला. आज आम्ही तुम्हाला गोरगरीबांसाठी अन्नदाता ठरलेल्या माणसाबद्दल सांगणार आहोत.
रामू दोसपती हे हैदराबादचे रहिवासी आहेत. कोरोनाकाळात गोरगरीबांची मदत करण्यासाठी त्यांनी ''राईस एटीएम'' सुरू केलं आहे. या उपक्रमाअंतर्गत रामू हे गोरगरीब लोकांना खाण्या पिण्याच्या वस्तू, धान्य पुरवतात. वृत्तसंस्था आयएएनएसने दिलेल्या माहितीनुसार रामू दोसपती यांचे हे एटीएम २४ तास सुरू असते. कोणलाही खाण्यासाठी काही हवं असल्यास डोसपती यांच्या घरी जाऊन रेशनचं सामान आणता येऊ शकतं. रामू गेल्या १७० दिवसांपासून गोरगरीबांना धान्य वाटत आहेत. नेहमीच त्यांच्या घरासमोर धान्य घेण्यासाठी लोकांची मोठी रांग लागलेली असते. आतापर्यंत ५ लाख रुपये खर्च करून १५ हजार लोकांची मदत त्यांनी केली आहे. विशेष म्हणजे या कार्यासाठी त्यांना स्थानिकांनी खूप साथ दिली आहे.
एका रिपोर्टनुसार रामू यांनी एकदा एका वॉचमनला भुकेलेल्या मजूरांची मदत करताना पाहिले. या वॉचमनने मजूरांसाठी २ हजार रुपये खर्च केले होते. त्यावेळी रामू यांना जाणवलं की, ६ हजार रुपये कमावणारा एक वॉचमन गोरगरिबांसाठी इतकं करू शकतो आणि एक एचआर मॅनेजर महिन्याला लाखो रुपये खर्च करून फक्त स्वतःच्या कुटूंबाबाबत विचार करतो. त्यानंतर रामू यांनी लोकांची मदत करायला सुरूवात केली. रामू स्वतः एक एमबीए ग्रॅज्युएट असून सॉफ्टवेअर कंपनीत HR मॅनेजर आहेत.