नवी दिल्ली: जगभरात अनेकविध भन्नाट आणि विचारांच्या पलीकडील गोष्टी घडताना आपण पाहतो. यामध्ये मानवी भावनांशी निगडीत गोष्टींचा सर्वाधिक पसंती, लोकप्रियता मिळत असते. मुक्या प्राण्यांशी निगडीत रेस्क्यूचे व्हिडिओ तर जगात फेमस होत असतात. मुके प्राणी कुठेतरी अडकतात आणि एखादी व्यक्ती किंवा दोन-तीन जण मिळून त्या प्राण्याची सुरक्षितपणे सुटका करतात. आजच्या सोशल मीडियामुळे या गोष्टी जगाच्या काना-कोपऱ्यात पोहोचत असतात. असाच एक पक्षाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. मात्र, दुसरीकडे मानवाचा क्रूर चेहराही अनेकदा समोर येतो. या सोशल व्हायरल व्हिडिओमधून निसर्गाचा चमत्कार की, मानवाचा अत्याचार हाच प्रश्न अनेकांना पडला आहे.
भारतीय वनविभागातील सुशांता नंदा यांनी एक व्हिडिओ शेअर केला आहे. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये एक पक्षी एका झाडात अडकल्याचे दिसत आहे. या मनमोहक आणि रंगीबेरंगी पक्षाची चोच या झाडात अडकलेली आहे. तर, मागून येणारी व्यक्ती या पक्षाला सुरुवातीला थोडी गोंजारते आणि नंतर एखाद्या निर्जीव खेळण्याला फटके द्यावेत, अशी कृती करताना दिसत आहे. त्यानंतर अलगदपणे या पक्षाची अडकलेली चोच त्या झाडातून मोकळी करते. या व्यक्तीच्या हतातही न मावणार पक्षी मुक्तता झाल्यावर क्षणार्धात उडून जातो, असे दिसत आहे. मात्र, यावरून युझर्सनी संमिश्र प्रतिक्रिया दिल्याचे दिसत आहे.
युझर्सनी दिल्या संमिश्र प्रतिक्रिया
काही युझर्सनी पक्षाची सुरक्षितपणे मुक्तता करणाऱ्या या व्यक्तीचे कौतुक केले आहे. त्याला शाबासकी देत चांगले काम केल्याचे म्हटले आहे. तर काहींनी गरीब पक्षी असे म्हणत मुक्या पक्षाविषयी कळवळा व्यक्त केला आहे. एका युझरने त्या व्यक्तीने पक्षाला वाचवले, यासाठी त्याचे आभार मानायला हवेत. पक्षाला रेस्क्यू करताना त्याने काल केले याकडे फारसे लक्ष देण्याची गरज नाही असे म्हटले आहे. यालाच प्रतिसाद देत दुसऱ्या एका युझरने याला अनुमोदन दिले आहे. तर दुसऱ्या एका युझरने याला विरोध दर्शवला आहे. हा पक्षी नैसर्गिकपणे अडकलेला नाही. या व्यक्तीने ही घटना मुद्दामहून रचली आहे, असा दावा केला आहे.