वाराणसीचा २२ वर्षीय सौरभ मौर्य सध्या देशातील तरुणांचा आदर्श ठरत आहे. सौरभ IIT BHU मध्ये तिसऱ्या वर्षात शिक्षण घेत आहे आणि त्यासोबतच तीन स्टार्टअप कंपन्या देखील तो चालवतोय. महत्वाची बाब म्हणजे या कंपन्यांचं वार्षिक उत्पन्न तब्बल २२ कोटी रुपये इतकं आहे. सौरभ एका सर्वसामान्य कुटुंबात जन्माला आलेला मुलगा असून त्यानं मोठ्या कष्टानं हे यश प्राप्त केलं आहे.
सौरभचं बालपणीचं शिक्षणवाराणसीच्या जवळच असलेल्या एका गावात झालं. राहत्या घरापासून तब्बल ४ किमी अंतरावर त्याची शाळा होती आणि तो नेहमी पायी शाळेत जायचा. "वाराणसीच्या छोट्याशा गावात मी राहत होतो. त्यामुळे त्यावेळी माझी स्वप्न देखील छोटीच होती. बाजारात जायचो तेव्हा कॉम्यूटर किंवा मोबाइलचं दुकान पाहून मीही असंच एक दुकान सुरू करेन असा विचार करायचो. पण माझ्या आजी-आजोबांचं स्वप्न वेगळंच होतं. त्यांना नेहमी वाटायचं मी खूप शिक्षण घ्यावं. त्यामुळे आम्हा तीन भावंडांना कुटुंबीयांनी शिक्षणासाठी वाराणसीला पाठवलं", असं सौरभ सांगतो.
दिवस-रात्र एक करुन JEE उत्तीर्ण झाला"मला आजही आठवतं मी इयत्ता ११ वीत होतो आणि माझे दोन्ही भाऊ १२ वीत होते. दोघंही IIT ची प्रवेश परीक्षा उत्तीर्ण झाले. मीही १२ वीनंतर IIT करावं अशी कुटुंबीयांची इच्छा होती. पण मला तेव्हा कॉम्प्यूटरचं दुकान सुरू करायचं होतं. कुटुंबीयांच्या सांगण्यानुसार मी IIT करायचं ठरवलं पण मी १२ वीत JEE परीक्षेत नापास झालो. त्यादिवशी मी खूप रडलो. कुटुंबीय माझ्या पाठीशी ठाम उभे राहिले आणि मी पुन्हा उभा राहिलो. त्यानंतर मी दिवस-रात्र मेहनत घेतली. हॉस्टेलची परिस्थिती, सण, कॉम्प्यूटर, सिनेमे, मोबाइल, सोशल मीडिया या सर्वांपासून मी दूर राहिलो आणि फक्त अभ्यासाकडे लक्ष केंद्रीत केलं. अखेरीस मी IIT JEE उत्तीर्ण झालो", अशी प्रेरणादायी कहाणी सौरभनं सांगितली.
करिअर नेमकं कसं घडलं?सौरभ सांगतो की,"IIT उत्तीर्ण झाल्यानंतर मला चांगल्या पगाराची नोकरी सहज मिळाली असती. पण मला सुरुवातीपासूनच स्वत:चं असं काहीतरी करायचं होतं. २०१८ साली जेव्हा मी फर्स्ट इयरला होतो तेव्हा मला आईनं बाबांच्या नकळत ५ हजार रुपये दिले होते. यातून मी माझ्या मित्राकडून सेकंड हँड मोबाइल खरेदी केला आणि इथूनच माझ्या नव्या करिअरची सुरुवात झाली"
एक यूट्यूब चॅनल सुरू केलं. यात तो IIT संदर्भातील काही महत्वाच्या टीप्स आणि धडे विद्यार्थ्यांना देऊ लागला. सुरुवातीला एक साधा बोर्ड देखील त्याच्याकडे नव्हता. हळूहळू पैसे जमा करुन सौरभनं १३०० रुपयांचा एक व्हाइट बोर्ड खरेदी केला आणि त्यावर टिप्स लिहून त्याचे व्हिडिओ शूट करुन चॅनलवर अपलोड करू लागला.
"मी व्हिडिओ तयार करण्याचं सातत्य कायम राखलं. त्यात कधीच खंड पडू दिला नाही. एकदा एका व्हिडिओवर एकानं कमेंट केली आणि सांगितलं की 'मित्रा आमच्याकडे आयआयटीसाठीचं शिक्षण देणारं कुणीच नाहीय. तू आमची शिकवणी घेशील का?' याच कमेंटनंतर मी माझा पहिला स्टार्टअप व्यवसाय सुरू केला. इयत्ता ११वी, १२ वीच्या अशा विद्यार्थ्यांना मी मार्गदर्शन देणं सुरू केलं की जे IIT ची तयार करत आहेत", असं सौरभनं सांगितलं.
२०१९ साली पहिली कंपनी, पहिल्याच वर्षी ११ कोटींची उलाढालविद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासोबतच त्यांच्यासाठी काही खास कोर्सेस तयार करणं देखील महत्वाचं होतं. याचाच विचार करुन सौरभनं २ हजार रुपयांत क्रॅश कोर्स संकल्पना सुरू केली. २०१९ साली एसएसडी एडटेक लिमिटेड नावाची कंपनी त्यानं सुरू केली. यात एका बाजूला विद्यार्थ्यांसाठी कोर्स आणि दुसऱ्या बाजूला मार्गदर्शन अशा पद्धतीनं काम करणं सुरू केलं. केवळ १५०० रुपयांनी सुरू केलेला स्टार्ट अप एकाच वर्षात ११ कोटी रुपयांच्या उलाढालीपर्यंत पोहोचला.
यासोबतच विद्यार्थ्यांना हॉस्टेल, पीजी, कर्ज यासारख्या सुविधा देण्यासाठी रँकर्स कन्सल्टन्सी प्रायव्हेट लिमिटेड कंपनी सौरभनं सुरू केली. यात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन, राहण्याची व्यवस्था, शिक्षणासाठीचं कर्ज या गोष्टींवर काम केलं. आजच्या घडीला सौरभच्या कंपनीच्या वाराणसीमध्ये तीन शाखा आहेत. तर एक शाखा गाझियाबादमध्येही आहे. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी २०० हून अधिक IIT चे मेंबर्स जोडले गेलेले आहेत. १३ शिक्षक आहेत. तर ३० हून अधिक लोक असे आहेत की जे विद्यार्थ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी काम करतात. महिन्याला किमान ४५ लाखांचे कोर्सेसची विक्री सौरभच्या कंपन्यांकडून होत आहे.