माणूस स्वत:साठी पैसा कमावतो, पुढच्या पिढीसाठीही पैसा कमावतो. अनेकदा पुढच्या पिढीत याच पैशावरुन भांडणं होत असल्याचंही आपण पाहतो. वडिलोपार्जित संपत्तीवरुन कुटुंबातील वाद कोर्टापर्यंत पोहोचलेला असतो. याशिवाय आपल्या लेकरा-बाळांवर प्रेम असल्याने त्यांच्यासाठी संपत्ती जमा करण्यातच अनेक माता-पित्यांचं आयुष्य खर्ची होतं. मात्र, सोशल मीडियावर सध्या एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे. त्यामध्ये, नोकरीतून निवृत्त झालेले वडिल त्यांच्या मुलांना इशाराच देत आहेत. वडिलांचा हा कठोरपणा पाहून नेटीझन्सने आश्चर्य व्यक्त केले आहे.
धरमवीर नावाच्या व्यक्तीने स्विमींग पुलमधील आपला व्हिडिओ शेअर केला आहे. त्यामध्ये, त्यांनी मुलांना इशारा देत तुमच्यासाठी तुम्ही स्वत: पैसा कमवा, मी कमावलेल्या पैशातून मी ऐश करणार, असे म्हटलंय. ''निवृत्तीनंतर मी निवांत आयुष्याची कल्पना करत होतो. माझ्या मुलांचा असा समज होता की, मी त्यांच्यासाठी पैसे कमवून ठेवेन, पण मी त्यांना एक पैसाही देणार नाही. ते स्वत: का कमवू शकत नाहीत? मी काय ठेका घेतला आहे का? मी माझ्या पैशाचा आनंद घेईन'', अशा शब्दात धरमवीर यांनी स्वत:च्याच मुलांना इशारा दिलाय.
''स्वत:साठी कमवा आपली मुले त्यांच्यासाठी स्वत: कमवतील'' असं वाक्यही धरमवीर यांनी कॅप्शनमध्ये लिहिलंय. धरमवीर यांचा हा लूक, मूड आणि आत्मविश्वास नेटीझन्सला चांगलाच भावलाय. धरमवीर हरयाणा या त्यांच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरुन त्यांनी हा व्हिडिओ शेअर केला असून लोकांनी कमेंट करुन त्यांच्या निर्णयाचं कौतुक केलयं.