Social Viral : भारतासारख्या विकसनशील देशात रस्ते अपघातांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. गेल्या वर्षभरात देशात रस्ते अपघातात १२ टक्क्यांनी वाढ झाली आहे. २०२२ मध्ये एकूण ४,६१,३१२ रस्ते अपघातांची नोंद झाली, ज्यामध्ये १,६८,४९१ लोकांचा मृत्यू झाला. पाहायला गेल्यास दुचाकी चालवताना हेल्मेटचा वापर न करणे किंवा चारचाकी वाहनातून प्रवास करताना सीट बेल्ट न बांधल्यामुळे अनेकजण मृत्यूच्या दाढेत सापडले आहेत. असे प्रकार टाळण्यासाठी छत्तीसगढमधील एका व्यक्तीनं केलेल्या कामगिरीचं सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
लेकीच्या लग्नाचे औचित्य साधून एका बापमाणसाने अनोखी कामगिरी केली आहे. अलिकडेच सोशल मीडियावर एका लग्न समारंभाचा व्हिडीओ तुफान व्हायरल होतोय. विशेष म्हणजे या लग्न सोहळ्यात वर-वधूची चर्चा होण्याऐवजी यजमान म्हणजेच मुलीचे वडील चर्चेच्या केंद्रस्थानी आलेत. सोशल मीडियावर हा व्हिडीओ पाहून लोकांनी या व्यक्तीचं तोंडभरून कौतुक केलं आहे.
हा व्हायरल व्हिडीओ छत्तीसगढमधील असल्याचं सांगण्यात येत आहे. वाढत्या अपघाताांविषयी जनजागृती करण्यासाठी या माणसाने वऱ्हाड्यांना चक्क हेलमेट भेट दिल्याचं पाहायला मिळतंय.
या व्हिडीओवर वधूचे वडील म्हणाले, ‘मला वाटतं माझ्या मुलीचं लग्न हा रस्ते अपघातांबद्दल जागरूकता निर्माण करण्याचा सर्वोत्तम प्रसंग आहे. मी पाहुण्यांना सांगितलं की जीवन अनमोल आहे, आणि मी त्यांना मद्यपान करून वाहन चालवू नका असं आवाहन देखील केलंय, कारण बहुतेक रस्ते अपघात मद्यपान करून वाहन चालवल्यामुळे होतात.'' अशी प्रतिक्रिया या व्यक्तीनं दिली आहे.