माणसानं नेहमी 'अंथरून पाहून पाय पसरावे' अशी म्हण आपल्याकडे बरीच प्रचलित आहे. परंतु काही जण केवळ बडेजाव करणे आणि दिखाऊपणासाठी सर्वकाही विसरतात. त्यात बहुतांश युवा वर्ग आहे. आपली हौस पूर्ण करण्यासाठी अनेकदा आई वडिलांवर ओझं टाकतात. इतकेच नाही तर काही महाभाग स्वत:च्या आई वडिलांना हौस पूर्ण न केल्यास घालून पाडून बोलतात. असाच एक लाजिरवाणा प्रकार सध्या सोशल मीडियावर समोर आला आहे.
नुकतेच चीनमधील एका रस्त्यावर हे दृश्य पाहायला मिळालं. जिथं एका मुलीनं तिच्या बापाला महागडा आयफोन खरेदी करण्याची ऐपत नाही त्यामुळे लाज वाटली पाहिजे असे शब्द वापरले. मुलीकडून हे बोलणं ऐकून बापाचा कंठ फुटला. अक्षरश: गुडघ्यावर बसून बाप मुलीची माफी मागू लागला. गेल्या ४ मे रोजी मध्य चीनमधील शांक्सी प्रांतातील ताइयुआनमध्ये ही घटना घडली. त्याचा व्हिडिओ एका व्यक्तीने त्याच्या कॅमेऱ्यात कैद केला आणि त्यानंतर सोशल मीडियावर अपलोड केला. हा व्हिडिओ पाहून युजर्स संतापले, सध्या व्हिडिओ खूप व्हायरल होत आहे.
व्हिडिओ बनवणाऱ्या व्यक्तीचं नाव झोंग असून त्याने सोशल मीडियावर लिहिलंय की, रस्त्यावरून जाताना बाप लेकीत इतकं जोरदार भांडण झालं ते स्पष्टपणे ऐकू येतंय. मुलगी तिच्या वडिलांवर ओरडतेय, जगातील आई बाप त्यांच्या मुलांना आयफोन खरेदी करून देतात. तुमच्याकडे पैसे का नाहीत? मुलीकडून बोलणं ऐकून घेत बाप स्वत:ला दोषी मानून खाली गुडघ्यावर बसला आणि डोक आपटू लागला. हे घडताना आसपासचे लोक बापलेकीकडे बघू लागले तेव्हा मुलीला लज्जास्पद वाटले आणि तिने बापाला खेचत उठा, उठा असं बोलू लागते.
जवळपास ५ मिनिटे हे पाहून वडिलांच्या अवस्थेवर झोंगला दु:ख वाटतं. मला हे पाहून असं वाटलं की, जवळ जात त्या मुलीला जोरात कानाखाली मारू असं झोंग म्हणाला. ही क्लिप चीनच्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. जवळपास ६ मिलियन लोकांनी ते पाहिले आहे. देशात हा विषय चर्चेचा बनला आहे. बहुतांश लोकांनी मुलीच्या या कृत्यावर संताप व्यक्त केला आहे. मुलगी किती गर्विष्ठ आणि निर्लज्ज आहे ज्यामुळे बापाची अशी अवस्था झाली असं काही युजर्सनं म्हटलं आहे.