नोएडा : सध्या हिंदू धर्मात पवित्र मानला जाणारा श्रावण महिना सुरू आहे. हा महिना भगवान शंकराला समर्पित मानला जातो. भोलेनाथाचा आशिर्वाद घेण्यासाठी अनेक भाविक श्रावण महिन्यात कावड यात्रेवर जातात. या भक्तांवर विविध भागातील लोक पुष्पवर्षाव करून त्यांचे स्वागत करत असतात. सध्या असाच एक व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्यामध्ये मुस्लिम बांधव कावड यात्रियांवर पुष्पवर्षाव करत आहेत. व्हायरल होणारा व्हिडीओ उत्तर प्रदेशातील नोएडातील असून माणुसकीचा संदेश देणारा हा व्हिडीओ अनेकांची मने जिंकत आहे.
दरम्यान, नोएडातील सेक्टर १२ मध्ये मुस्लिम समजातील लोकांनी कावड यात्रेवरून परतलेल्या भाविकांवर पुष्पवर्षाव करून आणि फळे भेट देऊन त्यांचे स्वागत केले आहे. यादरम्यान मुस्लिम युवकांनी भोलेनाथाच्या भक्तांना खांद्यावर उचलून घेत बंधुत्वाची भावना दाखवली. सध्या या घटनेच्या व्हिडीओची मोठ्या प्रमाणात चर्चा होत आहे.
मुस्लिम बांधवांनी दिला बंधुत्वाचा संदेशनोएडातील सेक्टर १२ येथे बाबा कलरिया हे मंदिर असून तिथे शिवलिंगावर जल अर्पण केले जाते. श्रावण महिन्याच्या पार्श्वभूमीवर मंदिरात भाविकांची वरदळ वाढली आहे. सोमवारी दुपारी १२ च्या सुमारास कावड यात्रेतील काही भाविकांचा एक गट हरिद्वार मधून नोएडातील सेक्टर १२ मध्ये पोहचला. इथे मुस्लिम बांधवानी बंधुत्वाचा संदेश देत सर्व भाविकांवर पुष्पवर्षाव करून त्यांचे स्वागत केले. काही मुस्लिम तरूणांनी भाविकांना खांद्यावर उचलून घेत हिंदुस्थान जिंदाबादचे नारे लावल्याने या घटनेची मोठी चर्चा रंगली आहे.
अलीकडेच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी हेलिकॉप्टरद्वारे कावड यात्रियांवर पुष्पर्षाव करण्याचे आदेश दिले होते. याशिवाय कावड यात्रियांच्या देखभालीसाठी विशेष खात्री बाळगण्यात आली होती. उत्तर प्रदेशासह अनेक भागात भाविकांवर पुष्पवर्षाव करण्यात आला. उत्तराखंड मधील हरिद्वारमध्ये देखील कावड यात्रियांवर पुष्पवर्षाव करण्यात आला.