चित्रपट-मालिकांमध्ये अनेकदा पुरुषांना महिलांच्या रूपात अभिनय करताना पाहिले असेल. असाच एक पारंपरिक सण केरळमध्ये दरवर्षी साजरा केला जातो, ज्यामध्ये अनेक पुरुष महिलांचे कपडे घालतात आणि त्यांच्याप्रमाणेच दागिने-मेकअप वगैरे करतात. नंतर त्यांच्यात स्पर्धा होते. त्यातीलच एका विजेत्या पुरुषाचा ‘लूक’ बघून नेटकरी थक्क झालेत.
‘चमायाविलक्कू’ नावाचा हा उत्सव कोल्लम जिल्ह्यातील कोट्टनकुलंगर श्रीदेवी मंदिरात दरवर्षी आयोजित केला जातो. केरळ पर्यटन संकेतस्थळानुसार, स्त्रियांच्या वेशभूषेत पुरुष दिव्य चमायाविलक्कू (पारंपरिक दिवा) हाती घेऊन मंदिराभोवती फिरतात आणि त्यांच्या इच्छा पूर्ण करतात, अशी श्रद्धा आहे. ट्रान्सजेंडर समुदायही हा सण साजरा करण्यात सक्रिय सहभाग घेतो. अनेक स्थानिक लोककथाही प्रचलित आहेत. मार्चच्या उत्तरार्धात, मीनम या मल्याळम् महिन्यात साजरा केला जातो.
भारतीय रेल्वेचे अधिकारी, अनंत रूपनागुडी यांनी ट्विटरवर फोटो शेअर केले असून वरील छायाचित्र मेकअपसाठी प्रथम पारितोषिक विजेत्या पुरुषाचे आहे, असे लिहिले. फोटो लगेचच तुफान व्हायरल झाला आणि ‘पैज लावून सांगतो, पुरूष असल्याचे सांगितले नसते तर कुणीच अंदाज लावू शकत नाही... मला तर सांगूनही विश्वास बसणे कठीण झाले आहे... ही व्यक्ती खरी कशी दिसत असेल याबाबत जास्त उत्सुकता आहे...भारत किती वैविध्यपूर्ण आहे, जाणून घेण्यासारखे-चकित होण्यासारखे बरेच काही आहे’ अशा अनेक प्रतिक्रिया नेटकरी देत आहेत.