नवी दिल्ली : देशात सर्वत्र 26 जानेवारीला प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात येतो. प्रजासत्ताक दिन जवळ आला की सर्वांचे लक्ष वेधले जाते ते म्हणजे दिल्लीच्या राजपथावर होणाऱ्या भारतीय जवानांच्या पथसंचलनाकडे (Republic Day Parade). शिस्त, देशप्रेम याचीच झलक या पथसंचलनातून पाहायला मिळते. दरम्यान, प्रजासत्ताक दिनाच्या परेडपूर्वी राजपथवर जवानांची तालीम जोरात सुरू आहे.
भारत सरकारने शनिवारी आर-डे सेलिब्रेशनसाठी भारतीय नौदलाच्या (Indian Navy) रिहर्सलचा व्हिडिओ ट्विट केला. व्हिडिओमध्ये भारतीय नौदलाचे जवान गणवेश परिधान करून बँड आणि रायफल हातात घेतलेले दिसत आहे. सर्व जवान विजय चौकात (Vijay Chowk) परेड मार्चसाठी बॉलिवूड गाण्यावर सराव करताना दिसत आहेत.
भारतीय नौदलाचे जवान 1967 च्या 'कारवां' चित्रपटातील 'पिया तू अब तो आजा... मोनिका, ओह माय डार्लिंग...' या प्रसिद्ध गाण्याची धून वाजवत सराव करताना दिसत आहेत. यावेळी भारतीय नौदलाचे जवान आपल्या रायफलवर थाप मारताना दिसले, तर काही जवान थरथरताना दिसले. भारतीय नौदलाच्या बँडकडून हे गाणे उत्साहात वाजवले जात असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. 2.25 मिनिटांचा हा व्हिडिओ आतापर्यंत 10 लाखांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे.
सोशल मीडियावर मोठ्याप्रमाणात व्हायरलहा व्हिडिओ @mygovindia ने आपल्या अधिकृत अकाऊंटवर शेअर केला आहे. या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे, 'काय दृश्य आहे! हा व्हिडीओ तुम्हाला नक्कीच थक्क करेल? तुम्ही आमच्यासोबत 73 वा प्रजासत्ताक दिन सोहळा पाहण्यास तयार आहात का?'. दरम्यान, भारतीय नौदलाच्या जवानांकडून वाजवलेली धून खरोखरच थक्क करणारी आहे. व्हिडिओ पाहून ट्विटर युजर्सना खूप आनंद झाला. कमेंट बॉक्समध्ये त्यांनी क्यूट, फॅब्युलस असे मेसेज केले आहेत.