पाणी पुरी हा तर सगळ्यांच्याच जिव्हाळ्याचा विषय आहे. बरेच लोक रोज न विसरता पाणी पुरीवर ताव मारतात तर काही लोक आठवड्यातून दोन-तीन वेळा तर खातातच. एकदा का पाणी पुरीची चटक लागली तर किती खावी आणि किती नाही असं होतं. आता तर दोन-दोन पावलांवर पाणी पुरीच्या गाड्या असतात. पाणी पुरीची गाडी दिसताच तोंडाला पाणी सुटतं. भारतात तर सहजपणे पाणी पुरी मिळते. पण जे भारतीय परदेशात असतात त्यांचं काय?
भारतातील अनेक लोक नोकरी किंवा एज्युकेशनसाठी परदेशात जातात. पण ते नेहमीच भारतातील अनेक गोष्टी सतत आठवत असतात. यातीलच एक बाब पाणी पुरी. परदेशात मोठ्या मुश्किलीने पाणी पुरी मिळत असेल. मिळालीच तर तेथील पाणी पुरीचे भाव ऐकूनच खाण्याची ईच्छा नाहिशी होत असेल. असंच काहीसं एका कपलसोबत झालं.
सोशल मीडियावर एका भारतीय कपलने त्यांचा एक व्हिडीओ शेअर केला. मुळचं हे कपल मध्यप्रदेशमधील राहणारं आहे. पण काही वर्षाआधी ते अमेरिकेला शिफ्ट झाले होते. अमेरिकेतील लाइफस्टाईलचे व्हिडीओ ते लोकांसोबत शेअर करत असतात. नुकतंच त्यांनी दाखवलं की, अमेरिकेत पाणी पुरीचे भाव किती असतात.
त्यांनी सांगितलं की, जर तुम्हाला अमेरिकेत पाणी पुरी खायची असेल तर तुमच्याकडे दोन पर्याय असतात. एक म्हणजे सुपरमार्केटमधून पाणी पुरीचं एक पॅकेट खरेदी करू शकता. ते पाच डॉलर म्हणजे साधारण चारशे रूपयात तुम्हाला 50 पाणी पुरी मिळतील. त्यात मसालाही मिळतो. जो पाण्यात मिक्स करून पाणी पुरी खाऊ शकता. दुसरं म्हणजे तुम्ही एखाद्या रेस्टॉरन्टमध्ये जाऊन पाणी पुरी खाऊ शकता. पण इथे तुम्हाला 800 रूपयांमध्ये सहा ते सात पाणी पुरीच मिळतील.
महिलेने जेव्हा पाणी पुरीचे भाव सांगितले तर लोक हैराण झाले. कारण पाणी पुरीचे इतके भाव त्यांनी कुठेच ऐकले नसतील. अनेकांनी कमेंटमध्ये लिहिलं की, इतक्या पैशात तर ते महिलाभर पाणी पुरी खाऊ शकतात. तर काही म्हणाले की, अमेरिकेनुसार ही किंमत बरोबर आहे.