India wins Gold Medal in Archery: भारताच्या सुवर्णकन्यांना तिरंदाजीच्या क्षेत्रात इतिहास रचला. ज्योती सुरेखा वेन्नम, अदिती स्वामी आणि परनीत कौर यांनी जागतिक तिरंदाजी अजिंक्यपद स्पर्धेत भारताला प्रथमच सुवर्णपदक जिंकून दिले. त्यांनी महिला कम्पाऊंड सांघिक गटाच्या अंतिम सामन्यात मेक्सिकोवर २३५-२२९ असा विजय मिळवला. यापूर्वी या स्पर्धेत भारताला ९ रौप्य व २ कांस्यपदके जिंकता आली होती. या तिघींनी भारताला पहिले सुवर्णपदक मिळवून दिले. जर्मनीची राजधानी बर्लिन येथे खेळल्या गेलेल्या स्पर्धेत भारतीय महिला संघाने उपांत्य फेरीत कोलंबियाचा २२०-२१६ असा पराभव केला होता. त्यानंतर फायनलमध्ये त्यांनी मेक्सिकोचा पराभव केला. त्यांच्या या यशानंतर, प्रसिद्ध उद्योगपती आनंद महिंद्रा यांनीही त्यांचे कौतुक केले.
भारतीय महिला नवनवीन शिखरे सर करत आहेत. त्यांच्या या यशाचे कौतुक आहे, पण आश्चर्य नाही. कारण, अर्जुनाला जसा फक्त पक्ष्याचा डोळा दिसायचा, तसा या भारतीय कन्यांनी लक्ष्यभेद करत Bulls Eye म्हणजे पैकीच्या पैकी गुण कमावले. भारताची मान अभिमानाने उंचावल्याबद्दल आम्हा सर्वांना तुमचा खूप अभिमान वाटतो. आमच्या भारताला हा सन्मान मिळवून दिल्याबद्दल धन्यवाद, अशा शब्दांत आनंद महिंद्रा यांनी ट्विटच्या माध्यमातून सुवर्णकन्यांचे कौतुक केले.
ज्योती सुरेखा वेन्नमला लहानपणापासूनच खेळाडू व्हायचे होते. जागतिक क्रमवारीत ती १२व्या क्रमांकावर आहे आणि तिला अर्जुन पुरस्कारानेही सन्मानित केले गेले आहे. तिचे वडील माजी कबड्डीपटू आहेत आणि आता विजयवाडा येथे पशुवैद्यकीय डॉक्टर आहेत. १६ वर्षीय आदितीने मागील महिन्यांत कोलबिया येथे झालेल्या तिरंदाजी विश्वचषकात कंपाऊंड महिला गटात १८ वर्षांखालील विश्वविक्रम मोडला होता. तिने ७२० पैकी एकूण ७११ गुण मिळवले आणि मागील ७०५ गुणांचा जागतिक विक्रम मागे टाकला. पटियालाच्या परनीत कौरचे वडील अवतार हे सनौर येथील सरकारी शिक्षक, त्यांनी परनीतला छंद म्हणून खेळ घेण्यास प्रोत्साहन दिले.