Indigo Flight Seat Cushion Missing:विमानाची तिकीटे बुक करताना लोकांच्या अनेक अपेक्षा असतात. जसे की, त्यांना चांगली सर्व्हिस मिळेल, विंडो सीट मिळाली तर उत्तमच...पण जरा कल्पना करा की, तुम्ही खूप चांगल्या प्रवासाची कल्पना करुन विमानात चढलात, पण तुम्हाला बसायला सीटच मिळाले नाही तर? असाच काहीसा प्रकार एका महिला प्रवाशासोबत घडला आहे. या महिलेने सोशल मीडियावर विमानाचे फोटो शेअर करुन आपबीती सांगितली. व्हायरल होत असलेले फोटो पाहून तुम्हालाही नक्कीच धक्का बसेल.
सध्या इंडिगो विमानात कुशन नसलेल्या सीटचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यवनिका राज शाह नावाच्या महिलेने बंगळुरू ते भोपाळ जाणाऱ्या इंडिगो फ्लाइटचे तिकीट बुक केले होते. पण, आपल्या जागेवर गेली असता, तिला सीटवर कुशन नसलेले दिसून आले. यानंतर तिने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' वर या सीटचे फोटो शेअर केले. फोटो पाहून नेटीझन्स Indigo च्या सेवेबाबत अनेक प्रश्न उपस्थित करत आहेत.
यवनिकाने या फोटोसोबत कॅप्शन दिले की, "सुंदर इंडिगो. मला आशा आहे की, मी सुरक्षितपणे लँडिंग करेल! ही तुमची बंगळुरू ते भोपाळ (6E 6465) फ्लाइट आहे." सध्या यवनिकाची पोस्ट व्हायरल होताच सोशल मीडियावर विमान सेवेबाबत वाद सुरू झाला. त्यानंतर इंडिगोकडूनही स्पष्टीकरणही देण्यात आले. इंडिगोने यवनिकाच्या पोस्टला प्रतिसाद दिला, "विमानाच्या क्लीनिंगमुळे सीटचे कुशन बदलण्यात आले होते. काही वेळातच सीटवर कुशन बसवण्यात आले." यवनिकाची पोस्ट आतापर्यंत 10 लाखांहून अधिक युजर्सनी पाहिली आहे.
गेल्या वर्षीही अशीच घटना घडली होतीविमानातील सीटवर कुशन नसण्याची ही पहिली घटना नाही. गेल्या वर्षी सागरिका पटनायक नावाच्या एका प्रवाशाला अशाच समस्येचा सामना करावा लागला होता. 26 नोव्हेंबरला ती पुण्याहून नागपूरला जाणाऱ्या इंडिगोच्या विमानात बसली. तिच्या सीटवर कुशन नव्हते. त्यानंतर तिच्या पतीने सीटचे फटो काढून सोशल मीडियावर शेअर केले.