Volcano Explosion : तुमच्यापैकी अनेकांनी ज्वालामुखी उद्रेकाचे व्हिडिओ पाहिले असतील. ज्वालामुखीचा उद्रेक इतके भीषण असतात की, अनेकदा यामुळे गावच्या गाव नष्ट होतात. जगभरात अनेकदा ज्वालामुखी उद्रेकाच्या घटना घडतात. इंडोनेशिया देशात जगातील सर्वात सक्रीय ज्वालामुखी आहेत. नुकताच, येथून एक व्हिडिओ समोर आला आहे, जो पाहून अनेकांच्या अंगावर शहारे आल्याशिवाय राहणार नाहीत.
पर्यटकांना सक्रिय ज्वालामुखी असलेल्या परिसरात न जाण्याचा इशारा दिला जातो. पण, काही अतिउत्साही पर्यटक अशा इशाऱ्यांना न जुमानता ज्वालामुखीवर जातात. इंडोनेशियातून असाच एक व्हिडिओ समोर आला आहे. येथील माउंट ड्युकोनो ज्वालामुखीवर काही पर्यटक चढले होते, यावेळी अचानक उद्रेक झाला. त्यामुळे पर्यटक घाबरले अन् जीव वाचवण्यासाठी उतारावरुन धावू लागले. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये हे भयानक दृश्य दिसत आहे.
व्हिडीओमध्ये टेकडीवर चढणारे लोक दिसत आहेत, यावेळी ज्वालामुखीतून राखेचे ढग आकाशात उडू लागतात. मिळालेल्या माहितीनुसार, हा ज्वालामुखीचा उद्रेक या महिन्याच्या सुरुवातीला झाला होता. सुदैवाने या घटनेत सर्व पर्यटक थोडक्यात बचावले. मीडिया रिपोर्ट्सनुसार, इंडोनेशियाच्या नॅशनल डिझास्टर एजन्सीच्या इशाऱ्यानंतरही पर्यटकांनी या धोकादायक भागात प्रवेश केला होता.
ज्वालामुखीपासून दूर राहण्याचा इशाराएजन्सीने 1930 च्या दशकापासून वाढत्या ज्वालामुखी उद्रेकांच्या पार्श्वभूमीवर माउंट डुकनो ज्वालामुखीपासून दूर राहण्याचा इशारा दिला आहे. मात्र, या इशाऱ्यांकडे दुर्लक्ष करत अनेकजण या भागात येतात.