>> संकेत कुलकर्णी (लंडन)
आज जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने थोडा इतिहास. १९१७ मध्ये रशियात महिलांनी चार दिवसांचा एक संप केला होता. ‘ब्रेड ॲंड पीस’ ही त्यांची मागणी होती. तो दिवस होता २३ फेब्रुवारी. पण रशियात तेव्हा होतं ज्युलियन कॅलेंडर. त्यावेळी ग्रेगोरियन कॅलेंडरमध्ये दिनांक होता ८ मार्च. हाच तो दिनांक आणि हीच ती घटना ज्यावरून संपूर्ण जगात ‘जागतिक महिला दिन’ साजरा केला जातो. साम्यवादी विचारसरणीमुळे जगापासून फारकत घेतलेल्या रशियाच्या बहुतांश क्षेत्रातल्या योगदानांबद्दल आपल्याला माहितीच नसते - मग ते योगदान युध्दभूमीवरचे असो किंवा अवकाशातले - आपण पश्चिम युरोपात - खासकरून ब्रिटन अमेरिकेकडे ह्यातले ‘पायोनियर्स’ पहायला जातो पण रशियाला विसरतो.
एक उदाहरण देतो. अवकाशात गेलेली पहिली स्त्री. कधी गेली होती हे सांगता येईल? साल सोडा - तिचं नाव कुणाला सांगता येईल? आपल्या डोक्यात येतील ती भारतीय नावं - म्हणजे कल्पना चावला किंवा सुनिता विल्यम्स - हे उत्तर संपूर्ण चूक आहे. ज्यांना ‘नासा’चा इतिहास माहीत आहे ते सांगतील सॅली राईड - १९८३ मध्ये. पण हेही चूक आहे. कारण अवकाशात पहिली स्त्री गेली होती १९६३ मध्ये - आणि ती पाठवली होती सोव्हिएट रशियाने - तिचं नाव व्हॅलेंटिना तेरेश्कोव्हा!
वयाच्या अवघ्या २६ व्या वर्षी - १६ जून १९६३ रोजी व्हॅलेंटिना ‘व्हॉस्टॉक ६’ ह्या रॉकेटमधून अवकाशात झेपावली. सोलो मिशन होतं ते - म्हणजे सोबत कुणीही नाही. सुमारे ३ दिवस आणि ४८ पृथ्वीप्रदक्षिणा करून ती १९ जूनला परत आली. सांगण्यासारखी गोष्ट म्हणजे - तिने अवकाशात घालवलेला वेळ (सुमारे ३ दिवस) हा त्यावेळच्या ‘नासा’ च्या सगळ्या अमेरिकन ॲस्ट्रोनॉटसनी त्यांच्या सगळ्या अवकाशात काढलेल्या मिशन्सच्या एकूण वेळापेक्षा जास्त होता - आता बोला! अजूनही जगातली सर्वात तरूण स्त्री कॉस्मोनॉट असण्याचा मान तिलाच जातो.
व्हॅलेंटिनाचा जन्म ६ मार्च १९३७ चा. परवाच ती ८६ वर्षांची झाली. एका साध्या कापडकारखान्यात कामगार असलेली व्हॅलेंटिना तिच्या स्कायडायव्हिंगच्या प्रेमामुळे अवकाशक्षेत्राकडे आकृष्ट झाली. १९६३ मध्ये रशियन कॉस्मोनॉट प्रोग्राम मध्ये रुजू झालेली व्हॅलेंटिना १९९७ मध्ये मेजर जनरल ह्या पदावरून निवृत्त झाली. आजही ती रशियातल्या राजकारणात ॲक्टिव्ह आहे. तिच्या जन्मगावाचे - यारोस्लाव्हल भागाचे नेतृत्व ती करते.
जागतिक महिला दिन आणि परवाच झालेल्या तिच्या जन्मदिवसाच्या निमित्ताने तिला शुभेच्छा!