नवी दिल्ली : सध्या सोशल मीडियाचे युग आहे, इथे सर्वच गोष्टी वेगाने पुढे चालल्या आहेत. आजच्या धावपळीच्या जगात लोकांच्या करमणुकीचे साधन म्हणजे सोशल मीडिया. जागतिक पातळीवर असे काही ब्रॅंड आहेत ज्यांनी प्रसिद्धीचे शिखर गाठले आहे. यामध्ये ॲपलचा ब्रँड अव्वल स्थानावर आहे, ज्याची खरेदी करण्यासाठी लोक काहीही करण्यास तयार असतात. आयफोनची नवीन सीरिज लवकरात लवकर विकत घेण्यासाठी लोकांमध्ये स्पर्धा लागते. मात्र सध्या चीनमधील बाजारामध्ये वेगळेच दृश्य पाहायला मिळत आहे ज्याची सोशल मीडियावर खूप चर्चा रंगली आहे.
भारताप्रमाणे चीनमध्ये देखील iPhone चे नवीन मॉडेल लॉन्च झाल्यावर काळाबाजार आणि त्याची मोठ्या किंमतीमध्ये विक्री करण्याचा धंदा सुरू होत असतो. मात्र चीनमध्ये आयफोन 14 चा काळाबाजार करणाऱ्या लोकांना मोठा झटका बसला आहे. कारण त्यांनी त्यांचा काळाबाजार घेऊन फुटपाथवर ठाण मांडले आहे. विशेष बाब म्हणजे ते सध्या तोट्यात असून त्यांना कोणीच खरेदीदार मिळत नाही.
फुटपाथवर विकला जातोय iPhone 14ज्या वस्तूला जास्त मागणी असते त्याचा काळाबाजार हा बाजाराचा एक भाग बनला आहे. एकदम भरमसाठ स्टॉक घेऊन आणि नंतर तो जास्त किंमतीला विकून नफा मिळवला जातो. आयफोन लवकर विकत घेण्यासाठी लोक त्यांना जास्त पैसे द्यायचे. मात्र यावेळी या लोकांना ते अधिकृत लॉन्च किमतीपेक्षा कमी किमतीत विकावे लागले. चिनी सोशल मीडियावर असे काही फोटो व्हायरल होत आहेत, ज्यामध्ये काळ्याबाजाराच्या आशेने फोन विकत घेतलेले लोक आता तो फुटपाथवर विकताना दिसत आहेत.
...म्हणून होत आहे नुकसानसाउथ चायना मॉर्निंगने दिलेल्या माहितीनुसार, यावेळी चीनमधील लोकांची आयफोन 14 च्या बेसिक मॉडेलला पसंती नसल्याचे दिसत आहे. इथे फक्त iPhone 14 Pro ची मागणी मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यामुळे ज्यांनी एकदम स्टॉकची खरेदी केली होती त्यांचे मोठे नुकसान झाले आहे. एवढेच नाही तर लोकांना बाजारातील मंदीविषयी भीती वाटत असल्याने ते जुन्या आवृत्तीवरच समाधान मानत आहेत. याशिवाय स्मार्टफोन मार्केटमधील मोठी स्पर्धा देखील याला कारणीभूत आहे. कारण बाजारातील व्रिक्रेते 55,000-66,000 रुपयांपर्यंत नफा मिळवायचे आणि आता ते स्वतः 11 हजारांच्या तोट्यातही विकायला तयार असल्याचे बोलले जात आहे.