(Image Credit : BroBible)
एक व्हिडीओ गेल्या काही दिवसांपासन सोशल मीडियात व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ इराणचा असून यात एका कपलने एकमेकांना लग्नासाठी प्रपोज केलं. पण त्यानंतर लगेच पोलिसांनी दोघांनाही अटक केली. या कपलने पब्लिक स्पेसमध्ये एकमेकांना लग्नासाठी प्रपोज केलं होतं. त्यामुळे त्यांना पोलिसांनी अटक केली. पोलिसांनी सांगितले की, या दोघांनी मुस्लिम धर्माच्या नियमांचं उल्लंघन केलं होतं. पण काही वेळाने दोघांना जामिनावर सोडण्यात आले होते.
व्हायरल झालेल्या या व्हिडीओनुसार, इराणच्या अराक शहरातील एका मॉलमध्ये एक तरूण रंगीबेरंगी फुग्यांमध्ये गुडघ्यावर बसून प्रेयसीला प्रपोज करत आहे. यावेळी त्याने तिला अंगठी देऊन प्रपोज केलं. तरूणाचं हे लग्नाचं प्रपोजल तरूणीनेही लगेच स्विकारलं. त्यांच्या या आनंदाच्या क्षणात इतरही लोकांनी सहभाग घेत टाळ्या वाजवून त्यांचं अभिनंदन केलं.
दोघांचीही ओळख पटली आहे. अराक शहर पोलीस प्रमुखांनी सांगितले की, अशाप्रकारच्या गोष्टी भलेही जगाच्या काही भागांमध्ये मान्य असतील. पण इराणच्या कायद्यानुसार आणि धर्मानुसार हे अमान्य आहे. म्हणून त्यांना अटक करण्यात आली होती.
तेहरान बार असोसिएशनने या कपलला अटक करण्यावर टिका केली आहे. यावर त्यांनी सांगितले की, कपलने कोणतही चुकीचं काम केलं नव्हतं. त्यांनी कुणाला नुकसानही पोहोचवलं नाही आणि सार्वजनिक वस्तूंचंही नुकसान केलं नाही. त्यामुळे त्यांना केलेली अटक चुकीचं होती.