Israel Hamas War: सोशल मीडियावर दररोज नवनवीन गोष्टी ट्रेंडिंगमध्ये येतात. सध्या ‘All Eyes on Rafah’ ही ओळ ट्रेंडिंगमध्ये आली आहे. हजारो-लाखो नेटकरी 'All Eyes on Rafa’ लिहिलेल्या फोटोवर कमेंट करताना दिसत आहेत. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर हा सर्वात मोठा ट्रेंड बनला आहे. विशेष म्हणजे, या मुद्द्यावरुन दोन गट पडले असून, एकमेकांवर टीका-टिप्पणी केली जात आहे. आता प्रश्न पडतो की, हे ‘All Eyes on Rafah’ नेमकं आहे तरी काय?
काय आहे ‘All Eyes on Rafah’? राफा हे गाझा पट्टीमधील एक शहर/ठिकाण आहे, जिथे नुकताच इस्रायली सैन्याचे (IDF) जोरदार हल्ला केला. इस्रायली लष्कराच्या हल्ल्यात राफात मोठ्या प्रमाणात मृत्यू झाल्यामुळे जगभरातून पॅलेस्टाईनला पाठिंबा मिळत आहे. युरोपीय देशही इस्रायलचा उघडपणे विरोध करताना दिसत आहेत. त्यामुळेच सध्या ‘All Eyes on Rafah’(सर्वांचे लक्ष राफावर आहे) सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला आहे. राफाची लोकसंख्या सुमारे 14 लाख आहे. उत्तर गाझामध्ये इस्रायली हल्ल्यानंतर अनेकांनी राफामध्ये आश्रय घेतला. आता इस्रायलने हा ठिकाणावरही हल्ला केला आहे.
भारतात 'राफा'ला पाठिंबाभारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्माची पत्नी रितिका सजदेहने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीद्वारे ‘All Eyes on Rafah’ अशी पोस्ट शेअर केली. पण, तिला प्रचंड ट्रोलिंगला सामोरे जावे लागले. यामुळे तिने थोड्यावेळाने आपली पोस्ट काढून टाकली. विशेष म्हणजे, बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनी ‘All Eyes on Rafah’च्या समर्थनार्थ पोस्ट केल्या आहेत. त्यामुळे सध्या सोशल मीडियावर दोन गट पडल्याचे पाहायला मिळत आहे.
राफाह हल्ल्यावर इस्रायलने काय म्हटले?या हल्ल्यांबाबत इस्रायलचे म्हणणे आहे की, हमासचे दहशतवादी राफा शहरात लपून हल्ले करत आहेत, त्यामुळेच इस्रायलने स्वसंरक्षणार्थ राफामध्ये कारवाई केली. दरम्यान, इस्रायलने राफत केलेल्या हल्ल्यात शेकडो निष्पाप लोकांचा जीव गेल्याची माहिती आहे.