‘ए मेरे वतन के लोगों’ हे गाणं (Song) जेव्हा वाजतं तेव्हा एक मधूर राग आणि आवाज कानावर पडतो आणि तो आवाज म्हणजे मेलडी क्वीन (Melody Queen) आणि नाईटिंगेल लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांचा आवाज. त्यांचं हे गाणं देशभरात इतके प्रसिद्ध आहे, की हे गाणं ऐकून प्रत्येक भारतीय त्यात हरवून जातो. हे गाणं ऐकून डोळे पाणावले नसतील, अशी व्यक्ती देशात क्वचितच असेल. देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनीही लता मंगेशकर यांच्या आवाजात हे गाणे पहिल्यांदा ऐकलं तेव्हा त्यांचेही डोळे ओले झाले.
या गाण्याशी संबंधित एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एका ITBP जवानानं भारतरत्न लता मंगेशकर यांना त्यांच्या खास शैलीत श्रद्धांजली वाहिली आहे. व्हिडिओमध्ये तुम्ही ITBP जवान ‘ए मेरे वतन के लोगों’ या गाण्यावर सॅक्सोफोन वाजवताना आणि लता मंगेशकर यांना एका अनोख्या शैलीत आदरांजली वाहताना पाहू शकता.
मुजम्मल हक असं या जवानाचं नाव असून तो आयटीबीपीमध्ये कॉन्स्टेबल म्हणून कार्यरत आहे. हा अप्रतिम श्रद्धांजली व्हिडिओ ITBPच्या अधिकृत ट्विटर हँडलवर शेअर करण्यात आला आहे आणि कॅप्शन लिहिलं आहे, ‘ए मेरे वतन के लोगों… कॉन्स्टेबल मुझम्मल हक, ITBPनं भारतरत्न लता मंगेशकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली’. अवघ्या २ मिनिटे १९ सेकंदाच्या या व्हिडीओनं लोकांची मनं जिंकली आहेत.
कवी प्रदीप यांनी ‘ए मेरे वतन के लोगों’ हे गाणं लिहिलं आहे. हे तुम्हाला कदाचित माहित असेल. या गाण्याशी संबंधित एक अतिशय मनोरंजक किस्सा आहे. असं म्हणतात, की जेव्हा लता मंगेशकर यांनी कवी प्रदीप यांचं हे गाणं ऐकलं तेव्हा त्या रडू लागल्या आणि त्यांनी या गाण्याला आवाज दिला तेव्हा ते ऐकून संपूर्ण देश रडला आणि आजही जेव्हा हे गाणं वाजतं तेव्हा लोकांच्या डोळ्यात पाणी येतं.