भारतात जवळपास प्रत्येक शहरात कुत्री, मांजरांचा हैदोस आहे. गेल्या वर्षभरात कुत्रा चावण्याचे प्रमाण तर वाढले आहे. यामुळे अनेक जण जखमी झाले आहेत. लखनऊ मध्ये तर एका महिलेचा पिटबुल जातीचा पाळीव कुत्रा चावल्याने जीव गेला आहे. म्हणजेच कुत्र्यांची दहशत चांगलीच वाढली आहे. फक्त रस्त्यावरचे कुत्रे नाहीत तर पाळीव कुत्रे सुद्धा कधी पिसाळतील याचा नेम नाही. पुण्यात तर कुत्रे, मांजर पाळायचे असतील तर त्यांची नोंद करणे बंधनकारक केले आहे.
एकीकडे भारतात ही परिस्थिती आहे तर दुसरीकडे एक देश असा आहे जिथे मुलांना जन्म घालण्यापेक्षा पाळीव प्राण्यांना पाळणे यावरच भर दिला जातोय. जपानसारख्या देशात लहान मुलांची जागा पाळीव प्राण्यांनी घेतली आहे. ग्लोबल इन्व्हेस्टमेंट कंपनी Goldman Sachs सतत विविध देशांच्या आर्थिक ट्रेंड्सचे निरीक्षण करत असते. यामध्ये त्यांना जपान बाबतीत ही गोष्ट निदर्शनास आली. जपानमध्ये जन्मदर घसरत आहे. येथील लोकसंख्येत तरुणांपेक्षा वयस्कर लोकच जास्त आहेत. तर इथले लोक मुल जन्माला घालण्याऐवजी कुत्री, मांजरं या पाळीव प्राण्यांच्याच प्रेमात आहेत. खासकरुन छोटे, कमी आयुर्मान असणारे प्राणी पाळण्यावर त्यांचा जास्त भर आहे. इथे १.४० कोटी मुलांची संख्या असून पाळीव प्राण्यांची संख्या २ कोटी झाली आहे.
या देशातील लोक खूपच मेहनती आहेत. ओव्हरवर्क करण्याकडे त्यांचा कल असतो. ओव्हरवर्कमुळे काही जणांचा मृत्यु देखील झाला आहे. ज्याला जपानी भाषेत karoshi असे म्हणले जाते. यामुळे इथल्या लोकांकडे मुलांचा सांभाळ करायला वेळच नाही. त्याजागी कुत्री, मांजरं पाळायला त्यांनी सुरुवात केली.
अशी पद्धत का सुरु झाली ?
पाळीव प्राण्यांना सांभाळणे सोपे असते. ते तुमचा जास्त वेळ पण मागत नाहीत. ऑफिसमधुन थकुन आल्यावर मुलांचा गृहपाठ घेण्याचीही गरज नाही. जापान सारख्या देशात लोक पाळीव प्राण्यांवर मुलांसारखेच प्रेम करतात. त्यांना सर्व सुखसोयी देतात. चांगले खाद्य, वॅक्सीन, सुट्टीला त्यांना फिरायला नेणे असे सर्व लाड त्यांचे होतात.त्यांच्यामुळे रिलॅक्स वाटते. एकटे वाटत नाही. जपानमध्ये थेरपी डॉग ही पद्धत पण सुरु झाली आहे. मिठी मारायला, प्रेम करायला, स्ट्रेस दुर करण्यासाठी पाळीव प्राणी वेळ घालवण्यासाठी दिले जातात. इतकेच नाही तर अनेक प्रसिद्ध ब्रॅंड पाळीव प्राण्यांसाठी डिझायनर कपडे देखील बनवतात.
या प्राण्यांच्या अंत्यसंस्कारावरही मोठ्या प्रमाणात खर्च केला जातो. बेसिक, इंटरमीडिएट आणि डिलक्स अशा प्रकारात अंत्यसंस्कार केले जातात. बेसिक मध्ये खर्च ६७ हजार रुपयांपर्यंत होतो तर लक्झरी चा खर्च अनेक कोटींपर्यंत होतो.