ट्विटर सध्या चांगलेच चर्चेत आहे ते म्हणजे तेथील नियम आणि कारवायांमुळे. एलॉन मस्कने ट्विटर खरेदी करताच कारवाईचा धडाकाच सुरु केला आहे. मग अगदी ट्विटरचे सीईओ पराग अग्रवाल यांनाही नोकरी गमवावी लागली आहे. दरम्यान ट्विटरचा अनेक भारतीयांनाही नोकरी सोडा असा आदेशच आला आहे. आता नोकरी जाणार तेही ट्विटरसारख्या प्रसिद्ध कंपनीतली म्हणल्यावर अंगावर काटा येणारच. मात्र २५ वर्षीय यश अग्रवाल या भारतीयाने त्याच्या ट्विटमधून सगळ्यांचेच मन जिंकले आहे. बघता बघता त्याचे ट्वीट सगळीकडेच व्हायरल झाले.
दिल्लीचा यश अग्रवाल २५ वर्षांचा असून तो ट्विटरमध्ये नोकरी करत होता. मात्र एलॉन मस्कने केलेल्या कारवाईत यशलाही नोकरी गमवावी लागली. तरी निराश न होता त्याने छान ट्वीट करत ट्वीटरचे आभारच मानलेत. यशने ट्वीट केले की, 'आत्ताच नोकरीवरुन काढण्यात आले आहे. बर्ड अॅप, या टीमचा, येथील संस्कृतीचा भाग झालो ही माझ्यासाठी अतिशय सन्मानाची बाब आहे. लव्ह ट्विटर' असे ट्विट करत त्याने ट्विटरचा लोगो असलेला शर्ट घालत सुंदर फोटो देखील अपलोड केला आहे. फोटोमध्ये त्याच्या चेहऱ्यावर हास्य आहे तर हातामध्ये ट्विटरचा लोगो असलेल्या उशा आहेत.
नोकरी गेल्यानंतरही त्याने दाखवलेली सकारात्मकता वाखणण्याजोगी आहे. तुझा हा सकारात्मक दृष्टीकोन तुला आयुष्यात खूप पुढे घेऊन जाईल अशी प्रतिक्रिया त्याला नेटकऱ्यांनी दिली आहे.