(Image Credit : Social Media)
स्पर्धा कोणतीही असो बक्षीस म्हणून कप, मेडल किंवा पैसेच मिळतात. बक्षीस काय मिळणार याचीही खेळाडूंसोबतच प्रेक्षकांनाही उत्सुकता असते. अशात एका स्पर्धेची चर्चा सोशल मीडियात चांगलीच होऊ लागली आहे. ही स्पर्धा आहे कबड्डीची.छत्तीसगडच्या गारियाबंद जिल्ह्यात एक कबड्डी स्पर्धा होणार असून याची चर्चा देशाभरात होत आहे.
दादरगांवमध्ये होणाऱ्या या कबड्डी स्पर्धेत आयोजरांनी बक्षीस म्हणून विजेत्यांना असं काही देण्याची घोषणा केली, ज्याची तुम्ही कधी कल्पनाही केली नसेल. या स्पर्धेत बक्षीस म्हणून बकरा, कोंबडा, मासे आणि अंडी देण्याची घोषणा आयोजकांनी केली आहे. या अनोख्या बक्षीसांचं पोस्टर सोशल मीडियात व्हायरल झालं आहे. ही कबड्डी स्पर्धा १५ सप्टेंबरला होणार आहे.
या स्पर्धेत विजेत्या ठरणाऱ्यांना प्रथम पुरस्कार म्हणून एक बकरा, द्वितीय पुरस्कार म्हणून २० किलो कोंबड्या, तृतीय पुरस्कार म्हणून १५ किलो मासे आणि चतुर्थ पुरस्कार म्हणून २०० अंडी दिली जाणार आहेत.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, गेल्यावर्षी देखील दादरगावात कबड्डी स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. पण त्यावेळी नगद रक्कम, स्मृती चिन्ह बक्षीस म्हणून देण्यात आलं होतं. त्यावेळी फार कमी टीमने यात सहभाग घेतला होता. त्यामुळे यावेळी आयोजकांनी अशी अनोखी बक्षिसे ठेवली आहेत.