सोशल मीडियात दररोज काही ना काही व्हायरल होत असतं. यात एखादी गोष्ट इतकी व्हायरल होती की त्याची ख्याती जगभर पसरते. त्यात इन्स्टाग्राम रिल्सची सध्या खूप चलती आहे. यात एखादं रिल व्हायरल झालं की ते थेट अगदी बॉलीवूड ते हॉलीवूडपर्यंतही पोहोचतं. सध्या पश्चिम बंगालमधील अशाच एका भुईमूग शेंगांची विक्री करणाऱ्या सर्वसामान्य व्यक्तीनं गायलेलं 'कच्चा बदाम' गाणं जगभरात पोहोचलं आहे. सर्वसामान्यांपासून ते अगदी सेलिब्रिटींना देखील 'कच्चा बदाम' गाण्याचं वेड लागलं आहे. 'कच्चा बदाम' गाण्यावर इन्स्टारील्स तयार करुन ते व्हायरल केले जात आहेत. प्रत्येक जण या गाण्यावर रिल्स तयार करत आहे.
कच्चा बदाम गाणं सोशल मीडियात तुफान व्हायरल झाल्यानंतर हे गाणं नेमकं कुणी गायलं आहे याचा शोध घेण्यात आला होता. अखेर सोशल मीडियातूनच याचा पत्ता लागला आणि पश्चिम बंगालमधील एक सर्वसामान्य भुईमूगाच्या शेंगांची विक्री करणाऱ्या व्यक्तीचं हे गाणं असल्याचं समोर आलं. या व्यक्तीचं नाव भुबन बादायकर असं असून ते रातोरात स्टार झाले आहेत. आता तर पश्चिम बंगाल पोलीसचे आयुक्त मनोज मालवीय यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी देखील भुबन यांचं कौतुक केलं आहे. पोलीस आयुक्त मनोज मालवीय यांनी भुबन यांना थेट पोलीस आयुक्तालयात निमंत्रित केलं होतं. भुबन यांचा पोलिसांकडून शाल आणि श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. भुबन बादायकर यांनी त्यांच्या गाण्यानं पोलीस अधिकाऱ्यांचंही मन जिंकलं आहे. भुबन यांनी पोलीस अधिकाऱ्यांसाठीही त्यांचं गाणं सर्वांसमोर गायलं आणि सर्वांनी त्यांचं तोंडभरुन कौतुक केलं.
भुबन बादायकर हे पश्चिम बंगालच्या कुरालजुरी गावचे रहिवासी आहेत. आपलं गाणं सोशल मीडियात हिट ठरल्याची भुबन यांना कल्पना देखील नव्हती. जेव्हा दूर दूर हून लोक त्यांची भेट घेण्यासाठी येऊ लागले तेव्हा त्यांना याची माहिती मिळाली. त्यानंतर लोकांनी भुबन यांच्यासोबत व्हिडिओ शूट करुन तो सोशल मीडियावर अपलोड करण्यास सुरुवात केली आणि भुबन देखील सर्वांपर्यंत पोहोचले.