कर्नाटकातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे म्हशीची डीएनए टेस्ट करून तिची मालकी ठरवली जात आहे. खरे तर, ही म्हैस एका मंदिराची असून शेकडो लोक तिची पूजा करतात. मात्र या म्हशीचा मालक कोण? यावरून दोन गावांमध्ये वाद सुरू आहे. हे प्रकरण कर्नाटकातील देवनागरी जिल्ह्यातील आहे. येथील कुनीबेलाकेर आणि कुलगट्टे गावांतील हा वाद आहे. दोन्ही गावांमधील अंतर सुमारे 40 किमी आहे. सध्या या म्हशीला शिवमोग्गा गोशाळेत पोलीस बंदोबस्तात ठेवण्यात आले आहे. देवनागरी जिल्ह्यात 2021 मध्येही असाच वाद उद्भवला होता, तेव्हाही म्हशींच्या मालकीचा वाद डीएनए चाचणीद्वारेच सोडवण्यात आला होता.
असं आहे संपूर्ण प्रकरण - गेल्या आठ वर्षांपूर्वी कुनीबेलाकेर गावातील करियम्मा देवीला एक म्हैस अर्पण करण्यात आली होती. यानंतर आता बेलेकर गावात नुकतीच एक म्हैस आढळून आली. ही म्हैस होनाळी तालुक्यातील कुलगट्टे गावातून बेपत्ता झाल्याचा दावा करण्यात येत आहे. कुलगट्टे गावातील लोकांनी ही म्हैस आपल्या गावी नेली आहे. संबंधित म्हैस गेल्या दोन महिन्यांपासून बेपत्ता असल्याचे याच गावातील मंडप्पा रंगनवार सांगतात. आता कुनीबेलाकर गावातील लोक या म्हशीवर आपला हक्क सांगत आहेत. हा वाद वाढत गेल्याने आता यात पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला आहे.
महत्वाचे म्हणजे, म्हशीच्या वयाचाही वाद आहे. म्हशीचे वय आठ वर्षे आहे, असा दावा कुनीबेलाकेरचे लोक करत आहेत. याच बरोबर म्हशीचे वय तीन वर्षे असल्याचे कुलगट्टा येथील लोक सांगत आहेत. तर पशुवैद्यकांच्या मते संबंधित म्हशीचे वय सहा वर्षं आहे. जे कुनीबेलाकेर गावाच्या दाव्या नजिक जाणारे आहे. मात्र, कुलगट्टे गावातील लोक हे मान्य करण्यास तयार नाहीत. यानंतर आता कुलगट्टे गावातील सात जणांविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करत डीएनए चाचणीची मागणी केली आहे.
यासंदर्भात बोलताना, देवनागरी जिल्ह्याचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक विजयकुमार संतोष यांनी म्हटले आहे की, डीएनए सॅम्पल कलेट्क करण्यात आले आहे. निकालानंतर वाद संपुष्टात येईल.