केरळमध्ये एक धक्कादायक प्रकार घडला असून त्या घटनेने सर्वांनाच हैराण करून ठेवलं. मुन्नारमधील इडुक्की जिल्ह्यातील एक वर्षाची मुलगी चालत्या गाडीमधून खाली पडली. हा सर्व प्रकार व्हिडीओमध्ये कैद झाला असून सोशल मीडियावर धक्कादायक घटनेचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.
मुन्नारमधील सब इंस्पेक्टरला शनिवारी रात्री जंगलातील वॉर्डनमधून एक फोन आला. ज्यामध्ये असं सांगण्यात आलं की, रस्त्याच्या मध्यभागी एक लहान बाळ दिसून आलं आहे. एका चेक पोस्टजवळ बाळ जखमी अवस्थेत पडलं आहे.
पोलिंसानी सांगितल्यानुसार, आई-वडिल आणि संपूर्ण कुटुंब गाडीतून प्रवास करत होतं. ते तमिळनाडूतील एका मंदिरामध्ये दर्शनासाठी गेले होते. तिथून परत येताना रस्त्यातील वणावर बाळ गाडीतून खाली पडलं. त्यावेळी गाडीमध्ये संपूर्ण कुटुंब झोपलं होतं. कुटुंबातील व्यक्तींना समजलंही नाही बाळ कधी आणि कुठे खाली पडलं. जंगलाच्या वॉर्डरनी पाहिलं की, एक बाळ चेक पोस्टवर रस्त्यावरून रांगताना दिसत आहे.
NDTV ने दिलेल्या वृत्तानुसार, सब इंस्पेक्टर संतोष यांनी सांगितले की, मला जवळपास रात्री 9:40च्या दरम्यान एक फोन आला. त्यानंतर आम्ही त्वरित त्या ठिकाणी जाऊन बाळाला ताब्यात घेऊन तिच्यावर उपचार केले. रात्री 11 वाजता आम्ही सर्व पोलिस स्टेशन्समध्ये बाळाबाबत मेसेज पाठवला. त्यानंतर 6 किलोमीटर दूर असलेल्या एका पोलिस स्टेशनमध्ये बाळ हरवलं असल्याची तक्रार नोंदविण्यात आली होती. लगेच आम्ही बाळाच्या आई-वडिलांना बोलावून बाळाला त्यांच्या ताब्यात दिलं.
सदर घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून त्यामध्ये बाळा गाडीतून पडताना दिसत आहे. त्या रस्त्यावर कोणीच नसून बाळ रांगत रस्त्याच्या पलिकडे निघून जातं. त्यानंतर जंगलाचे वॉर्डन बाळाला घेऊन निघून जातात.