मुंबई – बुधवारी केरळातील एका गर्भवती हत्तीणीच्या मृत्यूनंतर अनेक स्तरातून या घटनेचा निषेध व्यक्त करण्यात आला. काही टोळक्यांनी या हत्तीणीला फटाक्यांनी भरलेलं अननस खाण्यास दिल्याने त्याचा स्फोट होऊन हत्तीणीचे तोंड रक्तबंबाळ झाले. त्यानंतर तिने नदीच्या पाण्यात उभं राहून आपला जीव सोडला, या घटनेने संपूर्ण देशभरात हळहळ व्यक्त केली.
अगदी बॉलिवूड कलाकार, क्रीडा क्षेत्रातील दिग्गजांनीही या घटनेचा निषेध करत संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. या घटनेनंतर सोशल मीडियात संताप व्यक्त करण्यात आला आहे. एका मुक्या प्राण्यासोबत केलेल्या या कृत्याने माणुसकीवर प्रश्नचिन्ह निर्माण केलं. आपण इतकं निर्दयी बनलो का? असा सवाल उपस्थित केला जाऊ लागला. या घटनेची दखल केंद्र सरकारनेही घेतली, संबंधितांना कोणत्याही परिस्थितीत सोडणार नाही अशी ग्वाही सरकारने दिली.
या घटनेनंतर सोशल मीडियावर आणखी एका हत्तीचा जुना व्हिडीओ पुन्हा व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत हत्तीच्या पिल्लाला एक माणूस नदीत बुडताना दिसतो. त्याला वाचवण्यासाठी तो लहान हत्ती पाण्यात उतरतो आणि त्या माणसाला किनाऱ्यावर आणतो, हा माणूस पोहत असतो पण तो बुडत असल्याचा भास झाल्याने हत्ती पाण्यात उतरून त्याला वाचवण्यासाठी पुढे सरसावतो. केरळमध्ये झालेल्या घटनेनंतर हा व्हिडीओ सोशल मीडियात प्रचंड व्हायरल होत आहे.
नेचर एँड एनिमल नावाच्या ट्विटर युजरने हा व्हिडीओ शेअर करत लिहिलं आहे की, एक लहान हत्ती माणसाला पाण्यात बुडताना पाहून तो त्याला वाचवण्यासाठी पाण्यात उडी मारतो, आणि त्या माणसाला किनाऱ्यावर आणतो, आपण खरचं यासाठी पात्र नाही अशा शब्दात त्यांनी भावना व्यक्त केल्या आहेत. आतापर्यंत लाखो लोकांनी हा व्हिडीओ पाहिला असून अनेकांनी तो शेअर केला आहे.
काय होती केरळची घटना?
केरळ येथील मलाप्पूरम येथे ही धक्कादायक घटना घडली. भुकेने व्याकुळ असलेली गर्भवती हत्तीण मानवी वसाहती नजीक आली... तेव्हा स्वतःला बुद्धिजीवी समजणाऱ्या मनुष्य प्रजातीनं त्या आईची निर्घृण हत्या केली. काहीतरी खायला मिळेल या आशेनं आलेल्या या हत्तीणीला स्थानिकांनी अननसातून फटाके खायला दिली. अननसाचं आवरण असलेल्या पदार्थात स्थानिकांनी पेटते रॉकेट, बॉम्ब ठेवले होते. भुकेल्या हत्तीणीला हे समजण्यात विलंब झाला आणि तिनं तो पदार्थ अननस म्हणून खाल्ला. त्यानंतर तिच्या तोंडात फटाक्यांचा स्फोट झाला. असह्य वेदनेसह ती तेथून पळाली आणि एका नदीत जाऊन उभी राहिली. पण अखेर संघर्षानंतर तिने प्राण सोडले.
अन्य महत्त्वाच्या बातम्या
निर्दयी मनुष्य; गर्भवती हत्तीची निर्घृण हत्या; भुकेनं व्याकुळ भटकत होती वणवण
गर्भवती हत्तीच्या निधनावर भडकला सुबोध भावे, म्हणतोय माणूस म्हणून घ्यायची लाज वाटायला लागलीय
'ही भारतीयांची संस्कृती नाही'; गर्भवती हत्तीणीच्या मृत्यूची केंद्र सरकारने घेतली गंभीर दखल
आपण अजूनही रानटीच आहोत! गर्भवती हत्तीणीच्या हत्येचा रोहित, विराटसह क्रीडा विश्वातून तीव्र निषेध